T-20WC2026: अमेरिका-इराण युद्धामुळे ICC ची डोकेदुखी वाढली; टी-20 वर्ल्ड कपमधून मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंसमोर मोठे संकट!

अमेरिका आणि इराणमध्ये 28 फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली आहे. या युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर होणार आहे. सध्या भारत आणि श्रीलंका येथे सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) वर देखील याचे सावट पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आला आहे, अशा परिस्थितीत सर्व देशांचे खेळाडू भारत आणि श्रीलंकेतच अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आता या खेळाडूंना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी विशेष प्लॅन तयार करत आहे.

जेव्हा जेव्हा भारत किंवा श्रीलंकेत क्रिकेट सामने होतात, तेव्हा परदेशी संघ सहसा दुबईमार्गे आपल्या मायदेशी परततात. मात्र, अमेरिका-इराण युद्धामुळे दुबईचा हवाई मार्ग (Air Route) आता सुरक्षित राहिलेला नाही. इराण अशा प्रत्येक देशावर हल्ला करत आहे जिथे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. यामुळे अनेक संघांचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, मॅच अधिकारी आणि ब्रॉडकास्ट टीम भारत अन् श्रीलंकेतच अडकू शकतात. बहुतांश संघ दुबईमार्गेच परतणार होते, ही अडचण लक्षात घेऊन ICC आता पर्यायी मार्गांचा विचार करत आहे, जेणेकरून सर्वजण सुरक्षित घरी पोहोचू शकतील.

या युद्धाच्या परिणामावर आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या स्पर्धेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही आमची ट्रॅव्हल, लॉजिस्टिक्स आणि सुरक्षा टीम तैनात केली आहे. सर्व लोक सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय घरी परततील, यासाठी ही टीम अहोरात्र काम करत आहे. आम्ही चाहत्यांनाही आवाहन करतो की, त्यांनी प्रवासापूर्वी सर्व अधिकृत सूचनांचे पालन करावे.

Comments are closed.