वांद्रे पूर्व भारतनगरमधील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तातडीने सर्वेक्षण, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; राज्य सरकारचे विधानसभेत आश्वासन
वांद्रे पूर्व येथील भारतनगरमधील वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तातडीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल. अतिक्रमणे व झोपडपट्टीधारकांच्या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यावर भारतनगरचा पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानसभेत दिले.
भारतनगरचा पुनर्विकासास म्हाडा तयार असल्याचा सकारात्मक अहवाल ऑगस्ट महिन्यात सरकारला पाठवण्यात आला, पण सहा महिने झाले यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. या संदर्भात मुख्यमंत्र्यांपासून गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेतली. म्हाडाने या वसाहतीचा पुनर्विकास करावा अशी स्थानिकांचीही मागणी आहे. या वसाहतीचा पुनर्विकास किती कालावधीत होणार, असा सवाल शिवसेना आमदार वरुण देसाई लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केला. त्यावर उत्तर देताना मंत्री शंभुराज देसाई यांनी भारतनगर येथील मूळ जागा म्हाडाच्या ताब्यात असून येथील क्षेत्र 40 एकर पेक्षा अधिक आहे. या ठिकाणी म्हाडामार्फत रहिवाशांना वितरीत केलेल्या जागेबरोबरच काही अतिक्रमणधारक तसेच काही झोपडीधारक आहेत. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणे गरजेचे आहे. या सर्वांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्या परिसराच्या विकासाबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
भूखंड म्हाडाचा असताना यामध्ये एसआरएला स्वारस्य का?
म्हाडाने भारतनगरच्या पुनर्विकासाबाबत जो अहवाल सादर केला आहे त्याला मंजुरी देण्याची विनंती आम्ही सरकारला केली. पण मध्येच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने(एसआरए) या वसाहतीचा पुनर्विकास आम्हाला करायचा आहे असा अहवाल पाठवला. हा भूखंड म्हाडाचा आहे मग एसआरएला यामध्ये स्वारस्य का आहे? यामध्ये कोणाचे हितसंबंध गुंतले आहे असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला.
Comments are closed.