मध्य पूर्वेतील उड्डाणे स्थगित

‘एअर इंडिया’ने दिला प्रवाशांना सूचना-इशारा

प्रतिनिधी / नवी दिल्ली

मध्यपूर्वेत निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता, ‘एअर इंडिया’ने मध्यपूर्वेत जाणारी आपली सर्व विमाने स्थगित केली आहेत, अशी सूचना कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात देण्यात आली आहे. भारतातील कोणत्याही स्थळापासून मध्यपूर्वेत जाणारी सर्व विमाने स्थगित करण्यात आली आहेत, असे स्पष्ट केले गेले आहे.

कंपनीने नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. कंपनीच्या या प्राधान्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीचे परिस्थितीवर लक्ष असून कंपनी परिस्थितीची पडताळणी करत राहील आणि प्रवाशांना पुढच्या सूचना देण्यात येतील. कंपनीचा कर्मचारीवर्ग प्रवाशांना आवश्यक ते सर्व साहाय्य करण्यासाठी सज्ज आणि तत्पर आहे. प्रवाशांनी त्यांचे ‘फ्लाईट स्टेटस ’airindia.com/in/en/manage/f… या वेबसाईटवर पहावे. याच वेबसाईटवर अपडेटस् उपलब्ध आहेत. आणखी माहिती हवी असल्यास संबंधितांनी कंपनीच्या 91 1169329333, 91 1169329999 या चोवीस तास चालणाऱ्या मोबाईल सेवा क्रमांकांवर संपर्क करावा. airindia.com  अया वेबसाईटलाही भेट द्यावी, असे आवाहन ‘एअर इंडिया’ कंपनीकडून करण्यात आले आहे.

भारतीय दूतावासाचे आवाहन

सौदी अरेबियात असणाऱ्या सर्व भारतीय नागरीकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन सौदी अरेबिया प्रशासनानेही केले आहे. तसेच या नागरीकांनी स्थानिक प्रशासन आणि राजदूतावास यांच्याकडून दिल्या गेलेल्या सूचनांचेही पालन करावे, असे सौदी अरेबियाच्या प्रशासनाने प्रतिपादन केलेले आहे. रियाध येथे स्थित भारतीय दूतावासाच्या कार्यालयाकडून भारतीयांसाठी 00-966-11-4884697, 00-966-542126748 (केवळ व्हॉटस्अप) हे दूरध्वनी क्रमांक साहाय्यासाठी दिवसरात्र उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. आवश्यकता भासल्यास नागरीकांनी त्यांचा उपयोग करावा, असे आवाहन सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने केले आहे. cw.riyadh@mea.gov.in  हा ईमेल पत्ताही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचाही उपयोग केला जाऊ शकणार आहे.

कतारच्या संरक्षण विभागाकडून माहिती

कतार या देशावर करण्यात आलेले सर्व हल्ले परतवून लावण्यात आले आहेत. कतारच्या भूमीवर अनेक क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. तथापि संरक्षण विभागाच्या सज्जतेमुळे आणि तत्पर कृतीमुळे ते सर्व हल्ले निकामी करण्यात यश मिळाले. कतारच्या संरक्षण विभागाने परिस्थिती लक्षात घेऊन सज्जता केली होती. त्यामुळे डागण्यात आलेली सर्व क्षेपणास्त्रे आकाशातच आडविण्यात आली. आपल्या देशावरील हल्ले यशस्वीरित्या परतविण्याची सर्व क्षमता आणि साधनसामग्री कतारच्या संरक्षण विभागाकडे आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे, अशी माहिती कतारच्या संरक्षण विभागाकडूनही प्रसारित करण्यात आली आहे. या कतारचे सर्व नागरीक, वास्तव्य करणारे आणि पर्यटक किंवा अतिथी यांनी सावधानता बाळगावी. शांत रहावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच केवळ अधिकृत माहिती आणि घोषणांच्या अनुसारच वागावे, असे आवाहन कतारच्या संरक्षण विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनपत्रात करण्यात आलेले आहे.

Comments are closed.