लेख – एआय परिषदेच्या निमित्ताने…

>> अतुल म्हणतो

नवी दिल्लीत झालेली 'जागतिक एआय परिषद' जास्त चर्चिली गेली ती गलगोटियास विद्यापीठाच्या बनावटगिरीमुळे. सरकारतर्फे मात्र या परिषदेमुळे भारताने आता 'एआय'ला गवसणी घातलीच, असा देखावा निर्माण केला गेला. या परिषदेने काहीच साध्य झाले नाही असे नसले तरी या जागतिक सोहळ्याची नेमकी फलश्रुती काय? जगाला झपाटय़ाने आपल्या कवेत घेणाऱया एआय क्षेत्रात आपण खरंच नेमके कुठे आहोत? या परिषदेतून भारतातील आयटी क्षेत्र आणि व्यवसायाला नेमके काय मिळाले? मिळणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एआय परिषदेच्या गवगव्यानंतरही अनुत्तरितच राहिली आहेत

भारतात नुकत्याच पार पडलेल्या एआय परिषदेची एकंदर फलश्रुती काय? असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे. तसंच आपण काही मोठा विश्वविक्रम केला असा आव आणून मोठय़ा बाता मारणं जितकं चुकीचं आहे, तितकंच यातून अजिबात काहीच साध्य झालं नाही, असं म्हणणंसुद्धा एकांगी ठरेल. काही बाबतींमध्ये या परिषदेचे नक्कीच फायदे होतील अशी आशा वाटते. दुसरीकडे भारताची झाकून ठेवलेली काही खास वैगुण्ये यानिमित्तानं जगासमोर नुसतीच आली नाहीत, तर अक्षरशः लाज वाटावी अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली हेसुद्धा अजिबात नाकारता येणार नाही.

एआयचं क्षेत्र इथून पुढे काही वर्षे प्रचंड वेगानं वाढणार यात शंका नाही. जगभरात एआय क्षेत्रात काम करत असलेल्या कंपन्यांच्या बाजारमूल्यात विलक्षण वेगानं वाढ होताना दिसते. दुसरीकडे आता भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या एआयच्या झपाटय़ापुढे पूर्वीसारख्या टिकून राहणार नाहीत, अशी शंकासुद्धा व्यक्त केली जाते. तसंच ज्या कंपन्या जुन्या पद्धतीनं काम करत राहतील किंवा ज्यांचा एआयशी फार घनिष्ठ संबंध येत नाही अशा कंपन्यांना फार उज्जवल भविष्य नाही, असाही मतप्रवाह चांगलाच रुजत आहे. अशा वेळी नवी दिल्लीत झालेल्या एआय परिषदेचा भारतीय छोटय़ा आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांना नेमका काय आणि किती फायदा होऊ शकेल? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. एआयमधल्या काही विशिष्ट सोयींचा नेमका फायदा घेऊन सध्याच्या प्रश्नांना भिडू शकणाऱया कंपन्या याबाबतीत महत्त्वाच्या ठरतील. कारण एआय हे महाविशाल तंत्रज्ञान असल्यामुळे त्याचा नेमका अर्थ लावणं आणि आताच्या प्रत्यक्ष समस्या काय आहेत हे बघून त्या सोडवण्यासाठी एआयचा वापर करणं ही काळाची गरज आहे. या दृष्टीनं या परिषदेमधले काही मुद्दे उपकारक ठरू शकतील खरे; पण जागतिक पातळीवर यशस्वी ठरू शकतील अशा प्रकारची उत्पादनं निर्माण करण्यासाठी त्यातून फारसं काही हाती लागलं असेल असं वरकरणी तरी दिसत नाही. बहुतेक वेळा आपण कसे या परिषदेमध्ये सहभागी होतो हे दाखवण्यासाठीची छायाचित्रं समाज माध्यमांवर टाकण्याची धडपड यापलीकडे अशा गोष्टींचा फार फायदा होत नाही. कदाचित अगदी देशपातळीवर किमान एआय म्हणजे काहीतरी महत्त्वाचं आहे, असा संदेश या निमित्तानं गेला असला तरी प्रत्यक्ष कंपन्यांना तसंच व्यावसायिकांना यातून नेमकं काय मिळेल? या प्रश्नाचं ठोस उत्तर कुठेच दिसत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय निर्लज्जपणे चीनच्या यंत्रमानवावर बेदिक्कतपणे आपल्यामध्ये नसलेल्या बुध्दिकौशल्याचा ठसा उमटवण्याचा गलगोटियास विद्यापीठाचा उघडकीला आलेला प्रकार. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गलगोटियास विद्यापीठ हे फक्त हिमनगाचं टोक आहे. भारतामधल्या अनेक विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापन जास्त खराब दर्जाचं आहे की संशोधन? हाच संशोधनाचा विषय आहे. कुठलाही बिनमहत्त्वाचा विषय घ्यायचा, त्यावर कुणाच्याही आयुष्यातला कुठलाही प्रश्न सुटणार नाही किंवा खरोखर नवं असं काहीतरी आपल्याला उमजेल याची सुतराम शक्यता असणार नाही असं तथाकथित संशोधन करायचं किंवा तसा आव तरी आणायचा; असा अतिशय लाजिरवाणा प्रकार काही मोजके अपवाद वगळता सगळीकडे सतत सुरू असतो.

शिक्षणसम्राटांना आपले गल्ले भरण्याशिवाय आणि सतत प्रकाशझोतात राहण्याशिवाय इतर कशातही रस नसतो. गलगोटियास प्रकरणामुळे मात्र एका अर्थानं सगळ्यांचीच अब्रू चव्हाटय़ावर आलेली आहे. काही काळ कदाचित गलगोटियास विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या बाबतीमध्ये अडचणी येऊ शकतील. प्रत्यक्षातली खरी महाभयानक समस्या वेगळीच आहे. गलगोटियासचं नाव सध्या बदनाम झालेलं असलं तरी एकूणच एआयच्या युगात आता युवकांना नोकरी मिळवण्यासाठी नेमकी कोणती कौशल्ये लागतील आणि त्यासाठी काय केलं पाहिजे याचा जवळपास कुणालाही पत्ता नाही. जुनाट अभ्यासक्रम शिकवण्यात आणि असंख्य प्रकारचे ‘इव्हेंट्स’ तसंच ‘डेज’ साजरे करण्यात संस्था, शिक्षक, विद्यार्थी पार मशगूल आहेत. एकीकडे आपल्याला कल्पना येणार नाही इतक्या वेगानं एआयमुळे शिक्षणामधल्या सगळ्याच संकल्पना आमूलाग्र बदलत असताना या ‘आनंदी’ वातावरणाकडे बघून अक्षरशः धडकी भरते. लवकरच कंपन्या फक्त पदव्यांना महत्त्व न देता उमेदवार नेमके काय प्रश्न सोडवू शकतो/शकते याला महत्त्व देण्याची दाट शक्यता आहे. चार वर्षे  पदवी घेऊन जर कुणामध्ये उद्योगांना भेडसावत  असलेले प्रश्न सोडवण्यासंबंधीची तर सोडाच; पण ते समजून घेण्याची क्षमताही निर्माण होत नसेल तर अशा शिक्षणाचा नेमका कुणाला फायदा होतो, यावर खरोखर मुळापासून कुणी संशोधन केलं तर बऱयाच गोष्टींचा खुलासा होऊ शकेल.

'दुरुस्ती'चे काय होते?

याचं फक्त एक उदाहरण घेऊ. स्टॅनफर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठानं जाहीर केलेल्या जगामधल्या सगळ्यात नामांकित अशा वरच्या दोन टक्के संशोधकांच्या यादीत आपलं नाव आलं म्हणून दरवर्षी भारतामधले अनेक ‘महान’ प्राध्यापक आपली पाठ थोपटून घेतात. त्यांच्या संस्थादेखील त्यांचे सत्कार करतात. पहिला मुद्दा म्हणजे हे स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेलं शिक्कामोर्तब अजिबात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कुणीही खरोखर अभ्यास करून ही यादी प्रकाशित करत नाही. यामधली मेख म्हणजे कुठल्याही संशोधकाच्या शोध निबंधांचा किती जास्तीत जास्त वेळा इतर शोध निबंधांमध्ये उल्लेख झाला आहे यावरून ही यादी बनते. स्वाभाविकपणे अतिशय कुशाग्र बुद्धीच्या भारतीय संशोधकांनी एकमेकांचा उल्लेख वारंवार आपल्या शोध निबंधांमध्ये सुरू केला. खास करून संस्था चालक वगैरे लोकांना तर आपलं नाव चमकवण्यासाठी हे हक्काचं साधन मिळालं. साहजिकच ‘शेकडो’ भारतीय प्राध्यापक या जागतिक पातळीवरच्या तथाकथित यादीत असूनही त्यांच्या संशोधनाचं नेमकं काय होतं हा गुंता काही केल्या उलगडत नाही! नमुन्यादाखल सांगायचं तर या ताज्या यादीत गलगोटियासचे 15 प्राध्यापक होते. त्यांनी हे ‘यश’ भरपूर गाजावाजासह साजरंसुद्धा केलं होतं!

सारांश म्हणजे आपण काहीतरी भव्यदिव्य केलं किंवा त्यात सहभागी झालो असा आनंद मानून घेण्याच्या उत्सवी भारतीय मानसिकतेला अनुसरून एआय परिषदेविषयी जल्लोष करत असतानाच प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र काहीशी वेगळी आहे, याचं भान मनाशी बाळगणं जास्त संयुक्तिक ठरेल!

n शोध निबंधांच्या थप्प्या आणि पीएचडीधारकांची फौज असं चित्र असलेल्या देशामध्ये खरं म्हणजे जगाचे डोळे दिपवून टाकणारं असं काहीतरी घडलं पाहिजे. प्रत्यक्षात मात्र असं कुठे आढळलं तर अवाक् व्हावं इतक्या निर्ढावलेपणानं आपण याकडे दुर्लक्ष करण्याचं सोयिस्कर धोरण स्वीकारलं आहे. संशोधन हा टिंगलीचा विषय झाला आहे. पीएचडी ही कामाच्या ठिकाणी पुढचं पद मिळवण्यासाठी आवश्यक असते, इतकं साधंसोपं गणित आता रुजलेलं आहे. गलगोटियास विद्यापीठ हे फक्त एक उदाहरण झालं. असे उबगवाणे प्रकार देशभर दररोज अखंड सुरू असतात.

Comments are closed.