बॅग पॅकर्स – करेरी लेक ट्रेक

>> चैताली कानिटकर

करेरी लेक हा छोटासा परंतु साहसाचं दर्शन घडवणारा ट्रेक. इथल्या पर्वतराजीत निसर्गसौंदर्यासोबतच अध्यात्माचा शांत अनुभव देणारा हा ट्रेक जरूर करावा असा आहे.

हिमाचल प्रदेशातील धौलाधार पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 2,900 मीटर उंचीवर वसलेले करेरी लेक हे ठिकाण केवळ निसर्गसौंदर्यासाठीच नव्हे, तर त्याभोवती गुंफलेल्या आध्यात्मिक कथांसाठीही प्रसिद्ध आहे. स्थानिक गद्दी जमातीमध्ये अशी आख्यायिका प्रचलित आहे की, या सरोवराच्या पाण्यात शिवशंकराचे आशीर्वाद आहेत. धौलाधार पर्वत म्हणजेच शिवशंकरांचे निवासस्थान मानले जाते. एकदा ध्यानस्थ बसलेल्या शंकरदेवांनी आपल्या जटांमधून निघालेल्या जलधारेने हे सरोवर निर्माण केले, अशी लोकांची श्रद्धा आहे. करेरी लेकचे पाणी वर्षभर अतिशय स्वच्छ व निर्मळ असते. स्थानिक लोक म्हणतात की, “या सरोवरात खोटेपणा टिकत नाही.” जे मन, विचार आणि हेतू शुद्ध ठेवून येथे येतात, त्यांना मानसिक शांतता लाभते.

आपल्याकडे कमी अवधी असेल आणि कमी दिवसात ट्रेक करायचा असेल तर या ट्रेकचा पर्याय निश्चितच निवडता येईल. एप्रिल, मे, जून, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यांत हा शॉर्ट ट्रेक करता येतो. याची उंची फक्त 9700 फूट आहे. पहिल्या दिवशी धरमशाला ते करेरी गावापर्यंत गाडीने प्रवास आणि नंतर गावातून करेरी तलावाच्या मार्गावर लियोती येथे पहिली कॅम्प साईट लागते.

करेरी गाव 25 किमी अंतरावर असून गावात पोहोचण्यासाठी दोन तास लागतात. गावात पोहोचल्यावर संपूर्ण टूरचा थोडक्यात आढावा घेऊन पुढे भटकायला आपण मोकळे होतो. करेरीतील स्थानिक लोक गद्दी जमातीचे आहेत. इथे त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीची झलक अनुभवता येते. इथून पाइन, देवदार आणि रुंद पानांच्या मिश्र जंगलांमधून आपला ट्रेक सुरू होतो. येथे दाट जंगल आहे. त्यामुळे चालताना काळजी घ्यावी लागते. मुख्य कारण म्हणजे या मार्गावर पाइन सुया पसरलेल्या असतात. त्यामुळे या वाटा काहीशा निसरड्याही झालेल्या असू शकतात. मात्र लियोती कॅम्प साईटकडे जाणारा मार्ग खूपच निसर्गरम्य आहे. वाहत्या नदीवरून चालत, मध्ये लागणारे पूल ओलांडत जावे लागते. काही ठिकाणी दगडी वाटांवरूनही चालावे लागते. वाटेत धबधबा आणि छोटे छोटे झरे लागतात. या भटकंतीत फिजंट्स आणि ब्लू मॅग्पीसारखे स्थानिक पक्षी दिसू शकतात.

लियोती कॅम्प साईट 8,000 फूट उंचीवरील अल्पाइन गवताळ प्रदेशात आहे. इथेच रात्रीचे कॅम्पिंग असते. दुसऱया दिवशी करेरी तलावाकडे जाणारा ट्रेक करावा लागतो. पाइन वृक्षांमधून हा ट्रेक करताना हिमालयाचे सुंदर दृश्य दिसते. सुरुवातीला थोडं चिखलातून चालत जाताना नंतर खडकाळ भाग सुरू होतो. या डोंगराळ भागातून जाताना न्युंड नाला नावाच्या ओढ्यावरून चालत ही चढाई करावी लागते. या चढाईत ओढ्याच्या उगमापर्यंत म्हणजे करेरी तलावापर्यंत पोहोचेताना प्रवाह वाढत जातो. इथे कांगडा प्रदेशातील भटक्या गद्दी मेंढपाळ जमातीने बांधलेल्या गद्दी झोपड्या दृष्टीस पडतात. या झोपड्या म्हणजे तात्पुरत्या निवारा असतात. मेंढपाळ त्यांच्या गुराढोरांसह इथे काही काळासाठी वस्ती करतात.

नदीच्या काठावरील वाट तलावापर्यंत पोहोचवते. तेथील पाणी स्फटिकासारखे स्वच्छ आहे आणि सर्वत्र हिरवळ आहे. येथून धौलाधर पर्वतरांगांची विलोभनीय दृश्ये दिसतात. तलावाजवळ एक शिवमंदिर आहे. तेथे दर्शन घेऊन, तलावाची शांतता अनुभवून लियोटी कॅम्प साईटकडे उतरण्यास सुरुवात होते. हा मार्ग अल्पाइन कुरणांमधून आणि घनदाट जंगलांमधून जातो. या मार्गात निसर्गदृशंमधील बदल अनुभवताना खाली असलेल्या दरीची झलकही दिसते. आपण लियोतीला पोहोचेपर्यंत, दरी मावळत्या सूर्याच्या सोनेरी रंगात न्हाऊन निघते.

रात्रीच्या शांत कॅम्पिंगनंतर ताजेतवाने करणारा दिवस सुरू होतो. करेरी गावात उतरण्यापूर्वी आजूबाजूचा परिसर अनुभवण्यासाठी आणि पर्वतीय शांततेत रमण्यासाठी थोडा वेळ मिळतो. करेरी गावात उतरण्याचा मार्ग सुमारे 7 किमी आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 तास लागतात. वर जाताना आपण ज्या निसर्गरम्य वाटेने गेलो होतो, त्याच वाटेने उतरण आहे.वाट हळूवारपणे खाली वळत जाते. करेरीहून आपण धर्मशाळेला परत गाडीमार्गाने येतो, जे सुमारे 25 किमी अंतरावर आहे. संध्याकाळी 5ः30 वाजेपर्यंत धर्मशाळेला पोहोचत हा ‘शॉर्ट बट स्वीट’ ट्रेक पूर्ण होतो.
[email protected]

Comments are closed.