भाषेतील भेसळ रोखण्याची जबाबदारी माध्यमांचीच, विश्व मराठी संमेलनाच्या चर्चा सत्रात संपादकांचा सूर

मराठी भाषेच्या बाबतीत शुद्ध, अशुद्ध या दुराग्रहात अडकू नका, बातमी म्हणून भाषा प्रवाही असायला हवी, तसेच भाषेतील भेसळ रोखण्याची जबाबदारी ही माध्यमांचीच आहे, असा सूर विश्व मराठी संमेलनातील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या संपादकांच्या चर्चासत्रात उमटला.

केटीएचएम महाविद्यालयातील कुसुमाग्रज नगरीत विश्व मराठी संमेलनात शनिवारी सकाळी ‘माध्यमातील मराठी भाषा’ या विषयावर संपादकांचे चर्चासत्र झाले. यात साहिल जोशी (आज तक), कमलेश सुतार (झी 24 तास), नीलेश खरे (साम मराठी), मिलिंद बल्लाळ (ठाणे वैभव) आणि दीप्ती राऊत (दिव्य मराठी) यांनी सहभाग घेतला. संवादक भूषण करंदीकर होते.

हिंदी, इंग्रजी आणि मराठीतील कार्यक्रमात मोठा फरक असल्याचे सांगितले. मराठीत आशयावर अधिक काम केले पाहिजे, बातमी सांगताना भाषा उत्तम आणि ओघवती हवी, असे साहिल जोशी म्हणाले. दीप्ती राऊत म्हणाल्या की, समाजात भाषेची जी अवस्था असते, त्याचेच प्रतिबिंब माध्यमांत उमटत असते. हे पंगोरे लक्षात घेऊन सजगपणे विचार केला पाहिजे. वृत्तपत्रांनी भाषा अधिक जबाबदारीने वापरावी, ती सकस असावी, असे मत मांडले.

नीलेश खरे म्हणाले की, वृत्तवाहिन्यांवर सहज संवाद घडवायचा असल्याने भाषा वेगळी असते. जाहिरातीची, जेन-झीची आणि डिजिटल भाषा वेगळ्या आहेत. त्याचे पडसाद वृत्तपत्रीय भाषेवर पडू नये, वर्गीकरण हे जमायलाच हवे, माध्यम म्हणून आपली ही जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

व्याकरणाला सवलत असू शकते, पण चुकीच्या शब्दांना नाही, असे परखड मत कमलेश सुतार यांनी मांडले. भाषेचा त्या-त्या भागातील विशेष संस्कार असायला हवा. पण, शुद्ध व अशुद्ध असा दुराग्रह नकोच, बातमी म्हणून भाषा प्रभावी ठेवा, असे ते म्हणाले.

Comments are closed.