PAKvsSL: पत्रकार परिषदेत सलमान आगाला थेट प्रश्न! विचारले, “स्वत: कर्णधारपद सोडणार की…”

शेवटच्या सुपर-८च्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आणि आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मधून बाहेर झाले. पाकिस्तानच्या या स्पर्धेतील प्रदर्शनावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचा कर्णधार सलमान आगाची या स्पर्धेतील कामगिरी पाहता लवकरच त्याचे कर्णधारपद जाण्याची शंका आहे. तसेच काही वरिष्ठ खेळाडूंचा हा कारकिर्दीतील शेवटचा टी२० विश्वचषकही असू शकतो. यावरुन पाकिस्तानच्या संघात मोठ्या बदलाची शक्यता आहे.

श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानने २१२ धावा केल्या आणि ५ धावांनी तो विजय मिळाला, मात्र नेट रनरेटमध्ये त्याचा फरक जाणवला. यामुळे ते स्पर्धेबाहेर झाले. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने थेट सलमान अली आगाला तो कर्णधारपद स्वत: सोडणार की बोर्डाने तुम्हाला हटवले पाहिजे?

यावर सलमान हसत म्हणाला, “तुम्ही बरोबर म्हणत आहात. मी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत क्रमांक तीनवर येत उत्तम फलंदाजी केली होती, मात्र टी२० विश्वचषकात तसे झाले नाही.”

“माझ्या मते, संपूर्ण टी२० विश्वचषकात साहिबजादा फरहानच्या फलंदाजीव्यतिरिक्त बाकींनी निराशा केली. नेतृत्वावर आता निर्णय सांगता येणार नाही, मात्र तो निर्णय घेणे अवघड असेल. आम्ही आता परत जात असून थोडा विचार करू आणि निर्णय घेऊ”, असेही सलमानने पुढे म्हटले आहे.

सलमानच्या नेतृत्वाची कामगिरी पाहिली तर त्याने पूर्णपणे निराशा केली आहे. भारताविरुद्ध तर त्याने चारही सामने गमावले आहेत. यामध्ये तीन आशिया कप आणि एक टी२० विश्वचषक सामन्यांचा समावेश आहे.

तसेच काही सूत्रानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे संघाच्या कामगिरीबाबत नाखूष आहेत. नक्वी यांना संघनिवड अधिकारी आणि संघ व्यवस्थापकांनी संघ पूर्णपणे तयार असून टी२० विश्वचषकात उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास दिला होता, मात्र तसे काही झाले नाही.

याबरोबरच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमला अंतिम अकरामध्ये घेतले नव्हते. यामुळे त्याचा हा शेवटचा टी२० विश्वचषक आहे, अशा चर्चा सुरू झाल्या. आता पाकिस्तान संघात कोणते आणि किती बदल होतील, हे लवकरच कळेल.

Comments are closed.