फेयरवेल वनडेत एलिसा हिलीचा ‘रुद्र अवतार’; 27 चौकार, 2 षटकार अन् टीम इंडियाचा धुव्वा, ऑस्ट्रेलिय

ॲलिसा हिली ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला तिसरी वनडे : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय महिला क्रिकेट संघासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिका अत्यंत निराशाजनक ठरली. यजमान ऑस्ट्रेलियाने तीनही सामने जिंकत 3-0 असा दणदणीत क्लीन स्वीप केला. रविवारी 1 मार्च रोजी होबार्ट येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 409 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडिया 224 धावांवरच गारद झाली आणि 185 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या विजयासह ऑस्ट्रेलियाची कर्णधार आणि दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज एलिसा हिली हिने आपल्या वनडे कारकिर्दीला शानदार पूर्णविराम दिला.

फेयरवेल वनडेत एलिसा हिलीचा ‘रुद्र अवतार’

ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजीत कर्णधार एलिसा हिलीने अप्रतिम कामगिरी केली. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा वनडे सामना खेळताना तिने 158 धावांची खेळी खेळली संघाला 7 बाद 409 धावांपर्यंत मजल मारून दिली. यष्टिरक्षक फलंदाज बेथ मूनी हिनेही नाबाद 106 धावा करत शेवटच्या षटकांत वेगाने धावा जमवल्या आणि ऑस्ट्रेलियाला 400 चा टप्पा पार करून दिला.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला फोएबे लिचफिल्ड (14) हिच्या रूपाने लवकर धक्का बसला. मात्र त्यानंतर हिली आणि जॉर्जिया वोल (52 चेंडूत 62 धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी करून डाव सावरला. पुढे हिली आणि मूनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी 145 धावांची भक्कम भागीदारी करत संघाला प्रचंड धावसंख्येकडे नेले.

आपला 126वा आणि अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या हिलीने वनडे कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. तिच्या या तुफानी खेळीत 27 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. वोलने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला, तर मूनीच्या नाबाद खेळीत 10 चौकार आणि 1 षटकार होता.

स्नेह राणा अन् जेमिमा रोड्रिग्ज नडला, पण….

410 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून स्नेह राणा हिने सर्वाधिक 44 धावांची खेळी साकारली, मात्र तिच्या प्रयत्नांनंतरही संघाला मोठ्या पराभवापासून वाचवता आले नाही. याशिवाय जेमिमा रोड्रिग्जने टॉप ऑर्डरमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना काही काळ चांगली झुंज दिली. तिने केवळ 29 चेंडूत 42 धावांची आक्रमक खेळी साकारली, मात्र तिच्या बाद झाल्यानंतर भारतीय डाव कोलमडला. इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष प्रभाव पाडता आला नाही आणि परिणामी भारताला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीमध्ये अलाना किंग हिने सर्वाधिक 4 बळी घेत भारतीय फलंदाजीची कणा मोडली. जॉर्जिया वेअरहॅम हिने 2 बळी टिपले, तर निकोला कॅरी, अॅनाबेल सदरलँड आणि अॅश्ली गार्डनर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

हे ही वाचा –

Israel Vs Iran War : इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध पेटले! इंग्लंड-पाकिस्तान सामना रद्द, हॉटेलमध्येच थांबले संघ

आणखी वाचा

Comments are closed.