सिकंदर रझाची जिगरबाज खेळी, पण दक्षिण आफ्रिकेचा पलटवार, शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेचा पराभव

दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे T20 विश्वचषक 2026 : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा 5 विकेट्सनी पराभव केला. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा एकहाती झुंज देत राहिला, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्याने त्यांचा संघर्ष अपुरा ठरला.

सिकंदर रझाची जिगरबाज खेळी

प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 153 धावा केल्या. संघाकडून केवळ रझाच ठाम उभा राहिला. त्याने 43 चेंडूत 73 धावांची जिद्दी खेळी साकारली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले. मात्र त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पाही गाठता आला नाही.

गोलंदाजीतही रझाची छाप

154 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रझाने पहिल्याच षटकात क्विंटन डिकॉक याला बाद करत दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. त्यानंतरच्या षटकात त्याने विरोधी कर्णधार एडन मार्करम यालाही माघारी धाडले. सुरुवातीच्या तीन षटकांतच त्याने दोन महत्त्वाचे बळी घेत सामन्यात रंग भरला.

ब्रेविसची तुफानी खेळी

काही काळ रायन रिकल्टन (31) क्रीजवर टिकून राहिला, पण सामन्याचे पारडे डेवाल्ड ब्रेविस याने फिरवले. ब्रेविसने अवघ्या 18 चेंडूत 42 धावांची स्फोटक खेळी करत सामना दक्षिण आफ्रिकेकडे झुकवला. 101 धावांवर 5 विकेट्स गमावल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने हार मानली नाही.

शेवटची भागीदारी निर्णायक

यानंतर ट्रिस्टन स्टब्स (नाबाद 21) आणि जॉर्ज लिंडे (नाबाद 30) यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 53 धावांची भागीदारी रचत संघाला 13 चेंडू राखून विजय मिळवून दिला. दरम्यान, रझाने गोलंदाजीतही कमाल करत 4 षटकांत केवळ 29 धावा देत 3 बळी घेतले. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींत चमक दाखवूनही त्याचा पराक्रम झिम्बाब्वेसाठी विजयात रूपांतरित होऊ शकला नाही.

दक्षिण आफ्रिकेची विजयी घोडदौड

दक्षिण आफ्रिकेने आपले तिन्ही सामने जिंकून 6 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवास निश्चित झाला आहे. तर सलग तीन पराभवांसह झिम्बाब्वेचा संघ बाहेर झाला असून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान आता संपले आहे.

हे ही वाचा –

Pakistan T20 World Cup 2026 : नक्वी नाराज, पाकिस्तान बोर्डात खळबळ! बाबर आझमला गुडबाय, तर सलमान आगा कर्णधारपदावरून होणार OUT?

आणखी वाचा

Comments are closed.