कोकणातील पहिल्या मानाच्या चिपळुणातील श्रीदेवी करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाला सुरुवात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोकणातील पहिला मानाचा शिमगोत्सव अशी ओळख असलेल्या चिपळूण शहरातील गोवळकोट येथील श्रीदेवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर यांच्या शिमगा उत्सवाला शनिवारी सायंकाळी भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. सायंकाळी श्रीदेवी करंजेश्वरी मंदिरातून देवी करंजेश्वरी व श्री सोमेश्वर यांच्या पालख्या विधीवत बाहेर पडल्या. ढोल-ताशांच्या गजरात व भक्तांच्या जयघोषात या पालख्या गोवळकोट येथील ऐतिहासिक गोविंदगड किल्ल्यावर रेडझाई मातेच्या दर्शनासाठी पोहोचल्या. दर्शनानंतर रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीदेवी करंजेश्वरी आपल्या माहेरी म्हणजेच पेठमाप येथे आगमन झाले.

बाजार पुलावर दोन्ही पालख्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्री देव जुना कालभैरव देवस्थानासह अनेक ठिकाणची ढोल पथके या वेळी स्वागतासाठी सज्ज होती. संपूर्ण परिसर ढोल-ताशांच्या निनादाने दुमदुमून गेला होता. पेठमाप येथे पालखी आगमनानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास होम प्रज्वलित होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवीच्या ‘शेरणी काढण्याचा’ सोहळा सोमवारी पार पडणार असून त्यानंतर या मानाच्या शिमगा उत्सवाची सांगता होणार आहे. गोवळकोटसह संपूर्ण चिपळूण शहर परिसरात सध्या भक्ती, परंपरा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.