IND vs WI: वेस्ट इंडिजला धूळ चारत टीम इंडिया सेमीफायनलमध्ये; संजू सॅमसन ठरला विजयाचा खरा ‘हिरो’

सुपर-8 च्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडीज (india vs west indies) आमनेसामने होते. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील या लढतीत सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टॉस जिंकून वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. याचा फायदा घेत शाई होपच्या संघाने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 195 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाने शेवटच्या षटकात हा सामना 5 गडी राखून जिंकला आणि उपांत्य फेरीत म्हणजेच सेमीफायनल आपले स्थान पक्के केले.

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडीजला चांगली सुरुवात मिळाली. कर्णधार शाई होपने 32 धावा केल्या, तर सलामीवीर रोस्टन चेसने 40 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शिमरॉन हेटमायरने 27 धावांची भर घातली, तर शेरफेन रदरफोर्ड 14 धावा करून बाद झाला. शेवटच्या टप्प्यात रोवमॅन पॉवेलने 19 चेंडूंत नाबाद 34 आणि जेसन होल्डरने 22 चेंडूंत नाबाद 37 धावा ठोकल्या. यामुळे वेस्ट इंडीजने 20 षटकांत 195 धावांपर्यंत मजल मारली.

भारताकडून जसप्रीत बुमराहने (jasprit Bumrah) 2 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1-1 फलंदाजाला बाद केले.

विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे दोन्ही सलामीवीर या मोठ्या सामन्यात स्वस्तात बाद झाले. मात्र, दुसरा सलामीवीर संजू सॅमसनने (Sanju Samson) डावाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि 50 चेंडूंमध्ये नाबाद 97 धावांची झुंजार खेळी खेळली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 4 षटकार लगावले. तसेच कर्णधार सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या, तर तिलक वर्माने 27 धावांची छोटी पण अत्यंत महत्त्वाची खेळी साकारली. शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याने 17 धावांचे मोलाचे योगदान दिले, ज्यामुळे टीम इंडियाने शेवटच्या षटकात 5 गडी राखून विजय मिळवला.

वेस्ट इंडीजकडून शमार जोसेफ आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. या विजयासह भारतीय संघाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Comments are closed.