अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे ४८ बडे नेते ठार, ऑपरेशन वेळेच्या आधीच पूर्ण; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे ४८ महत्त्वाचे नेते मारले गेले आहेत. ट्रम्प म्हणाले आहेत की, हे लष्करी ऑपरेशन अत्यंत यशस्वी ठरले असून ते ठरवलेल्या वेळेच्या आधीच प्रगतीपथावर आहे.
एकाच झटक्यात ४८ नेत्यांचा खात्मा
‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेबद्दल माहिती देताना सांगितले की, “कोणालाही विश्वास बसणार नाही इतके मोठे यश आम्हाला मिळाले आहे. एकाच झटक्यात इराणचे ४८ नेते संपले आहेत. हे ऑपरेशन अत्यंत वेगाने पुढे सरकत आहे.” या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
ऑपरेशन 'एपिक फ्युरी'
अमेरिकेने या मोहिमेला ऑपरेशन इपिक फ्युरी, असे नाव दिले असून, इस्रायलच्या रोअरिंग लायन (Roaring Lion) मोहिमेसोबत मिळून हे हल्ले करण्यात आले. ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना नष्ट करणे, त्यांचे नौदल निकामी करणे आणि तिथल्या सत्ताधारी राजवटीला धडा शिकवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. “इराणची राजवट अत्यंत हिंसक आहे आणि आम्ही केवळ स्वतःसाठीच नाही, तर जगाच्या शांततेसाठी हे काम करत आहोत,” असेही ट्रम्प यांनी नमूद केले.
इराणच्या नौदलाला मोठा फटका
हवाई हल्ल्यांव्यतिरिक्त अमेरिकन सैन्याने इराणच्या नौदलावरही जोरदार प्रहार केला आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या ९ नौदल जहाजांना समुद्रात बुडवण्यात आले आहे. यामध्ये काही मोठी आणि महत्त्वाची जहाजे होती. इराणच्या नौदलाचे मुख्यालयही मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
Comments are closed.