ऐन परीक्षेच्या काळात स्कूल बसेसचा गुरुवारी बंद
मोटार वाहन विभाग आणि पोलिसांमार्फत ई-चलान प्रणालीद्वारे दंडवसुली केली जात आहे. त्याला तीव्र विरोध करीत स्कूल बस मालक संघटनेने गुरुवारी, 5 मार्चला राज्यव्यापी बंद पुकारण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. या दिवशी मुंबईसह संपूर्ण राज्यभर एकही स्कूल बस किंवा व्हॅनची सेवा उपलब्ध राहणार नाही, असे संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले. या बंदमुळे ऐन परीक्षेच्या काळात शालेय विद्यार्थी वाहतूक कोलमडणार आहे.
ई-चलान प्रणालीद्वारे दंडवसुली केली जात असल्याने राज्यभरातील वाहनधारकांत संतापाची लाट उसळली आहे. ही दंडवसुली नियमबाह्य लूट असल्याचा दावा करीत राज्यातील वाहनधारकांनी 5 मार्चला बंद पुकारण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. या दिवशी ट्रक, टेम्पो, बस, टॅक्सी व ऑटो वाहतूकदारांसोबत स्कूल बसेस सहभागी होणार असल्याचे स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी रविवारी स्पष्ट केले. स्कूल बसकडूनच अतिरिक्त दंड वसूल केला जातो. ही सर्व लूट थांबली पाहिजे, यादृष्टीने सरकारने ई-चलानच्या जीआरचा पुनर्विचार करावा आणि सुरक्षित शालेय वाहतुकीसाठी सुरक्षिततेची मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, असे म्हणणे स्कूल बस मालक संघटनेने मांडले आहे.
पर्यायी व्यवस्थेसाठी पालकांना आवाहन
पालकांनी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करावी, संबंधित शाळा अधिकाऱयांनी तशी व्यवस्था केल्यास विद्यार्थी खासगी वाहतुकीद्वारे किंवा ऑनलाइन वर्गांद्वारे हजेरी लावू शकतात, असे स्कूल बस मालक संघटनेने म्हटले आहे.
Comments are closed.