इराण-इस्रायल युद्धाचा फटका – जेएनपीए बंदरात कांदा, केळी, द्राक्षांचे एक हजार कंटेनर्स अडकले
इराण-इस्रायल, अमेरिका युद्धाचा फटका हिंदुस्थानला मोठय़ा प्रमाणावर बसू लागला आहे. आखाती देशांमध्ये निर्यातीच्या तयारीत असलेले कांदा, केळी, द्राक्षांचे सुमारे एक हजार कंटेनर्स शनिवारपासून जेएनपीए बंदरात अडकले आहेत. निर्यातीवर 60 टक्के परिणाम झाला असून आखाती देशांकडे माल घेऊन जाणाऱ्या हिंदुस्थानी जहाजांना अर्ध्या वाटेतून पुन्हा मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जेएनपीए बंदरातून इराक, सौदी, कतार आदी देशांमध्ये कांदा, केळी, द्राक्षे व अन्य फळांची निर्यात केली जाते. मात्र आखाती देशांमध्ये पेटलेल्या युद्धांमुळे शिपिंग कंपन्या भयभीत झाल्या असून मालवाहू जहाजांवर हल्ला होण्याच्या भीतीमुळे शनिवारपासून एकही कंटेनर गेलेला नाही. युद्धाचे ढग दूर होईपर्यंत मालाची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फळे, कांदा या वस्तू नाशवंत असल्याने युद्ध लवकरात लवकर थांबले नाही तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आठवडाभर वाट पाहावी लागेल
युद्धाच्या भीतीने शिपिंग कंपन्या निर्यात करण्यास तयार होत नाहीत. जेएनपीए बंदरातून दर आठवडय़ाला 54 मालवाहू जहाजांची ये-जा होत असते. युद्धाच्या प्रत्येक घडामोडींवर आम्ही लक्ष देऊन असून हिंदुस्थानच्या कोणत्याही जहाजाचे नुकसान होऊ नये यासाठी काळजी घेत असल्याचे श्वान ओव्हरहेड एक्स्पोर्ट कंपनीचे मालक राहुल पवार यांनी सांगितले. जेएनपीए बंदरातील मालवाहतूक सुरळीत होण्यासाठी किमान आठवडाभर वाट पाहावी लागेल, असा अंदाज अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.
होर्मुझच्या समुद्रात तेलवाहू जहाज लक्ष्य, 15 हिंदुस्थानी कर्मचारी बचावले!
इराणने आज ओमानजवळच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला. या जहाजावर 20 कर्मचारी होते. त्यात 15 हिंदुस्थानी आणि पाच इराणी नागरिकांचा समावेश होता. या सर्व कर्मचाऱयांची सुटका करण्यात आली आहे. मात्र त्यातील चौघे जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने रेडिओ ट्रान्समिशनद्वारे होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी बंद असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज इराणने मुसंदम द्वीपकल्पावरील खासाब बंदरापासून पाच नॉटिकल मैलावर असलेल्या तेलवाहू जहाजाला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली. मात्र, ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने वेळीच हालचाल केल्याने पुढील अनर्थ टळला.
Comments are closed.