युद्धामुळे पश्चिम आशियात सीबीएसईच्या परीक्षा रद्द झाल्या

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सीबीएसईने मध्य-पूर्व प्रदेशात म्हणजेच पश्चिम आशियात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी नवीन तारखा निश्चित केल्या जाणार असल्याची घोषणा रविवारी केली. 2 मार्च 2026 रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांकडून अपडेट माहिती पुरविली जाणार आहे. अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे बहरीन, इराण, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युएईमधील सीबीएसईशी संलग्न शाळांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 5 मार्चनंतरच्या परीक्षांबाबत 3 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षांबाबत काळजी करू नये आणि नियमितपणे आपला अभ्यास सुरू ठेवावा. बोर्ड शाळांद्वारे नव्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करेल, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Comments are closed.