सोनईत सेवानिवृत्त शिक्षकाकडे मागितली 10 लाखांची खंडणी, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; चौघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सेवानिवृत्त शिक्षकाला 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात महिलेचाही समावेश असल्याने हनिट्रप प्रकरण समोर आले आहे.

अशोक नेटके, किशोर जयसिंग साळवे, कृष्णा वैरागर, गौरव वाघमारे (सर्व रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सोनई येथील अर्जुन मारुती ओहोळ (66) हे मुळा कारखाना जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे राहतात. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे 27 फेब्रुवारीला तक्रार दाखल केली. जिल्हा पोलीसप्रमुखांनी सोनई पोलीस ठाण्याला तक्रार दाखल करून घेण्याचे व आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. 20 ते 27 फेब्रुवारीदरम्यान भाग्यश्री जाधव-गायधने (रा. श्रीरामपूर) या महिलेने फिर्यादी शिक्षकास वेळोवेळी फोन करून संदेश पाठवून अश्लील चित्रीकरणाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

तसेच अटक केलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या घरी घुसून दहा लाख रुपयांची मागणी केली. अर्जुन ओहोळ यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले. उर्वरित रक्कम न दिल्यास नातेवाईक व कुटुंबीयांना व्हिडीओ पाठवण्याची धमकी दिली. सोनई पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत आरोपींना अटक केली असून, सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे तपास करत आहेत.

Comments are closed.