रोहित-विराट ‘या’ दिवशी दिसणार टीम इंडियाच्या जर्सीमध्ये! बीसीसीआयने अफगाणिस्तान दौऱ्याची केली घोषणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अफगाणिस्तानच्या दौऱ्याचे वेळापत्रक सोमवारी (२ मार्च) जाहीर केले आहे. यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार असून एकमात्र कसोटी सामना होणार आहे. हा कसोटी सामना आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपचा भाग नसणार आहे, कारण अफगाणिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग नाही. हा कसोटी सामना ६ ते १० जून दरम्यान चंडिगडमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर वनडे मालिका सुरू होणार आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या माहितीनुसार,वनडे मालिकेतील पहिला सामना १४ जूनला धरमशालामध्ये खेळला जणार आहे. १७ जूनला दुसरा सामना लखनऊमध्ये आणि २० जूनला तिसरा सामना चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी खेळले जाणार आहेत. कसोटी सामन्याची सुरूवात सकाळी ९.३० ला होणार आहे.

भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ते भारताकडून केवळ वनडे सामने खेळतात. आता ते चाहत्यांना भारतीय जर्सीमध्ये १४ जूनला दिसणार आहेत. त्यांनी शेवटचा वनडे सामना १८ जानेवारीला न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यामध्ये विराटने १२४ धावा केल्या होत्या. तो सामना भारताने ४१ धावांनी गमावला होता.

आयसीसी वनडे विश्वचषक २०२७च्या दृष्टीने ही मालिका या दोघांसाठी महत्वाची आहे. या मालिकेनंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामध्ये ५ टी२० सामन्यांची मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे.

भारतीय संघ सध्या टी२० विश्वचषकात व्यस्त आहे. त्यामध्ये ५ मार्चला भारताचा उपांत्य फेरीत इंग्लंडशी सामना होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्चला खेळला जाणार आहे. त्यानंतर २८ मार्चपासून आयपीएल २०२६ सूरू होत आहे. त्याचा अंतिम सामना ३१ मे ला खेळला जाणार आहे.

अफगाणिस्तानचा भारत दौरा, 2026
कसोटी – 6 ते 10 जून, न्यू चंदीगड
पहिला वनडे सामना – 14 जून, धरमशाला
दुसरा वनडे सामना – 17 जून, लखनऊ
तिसरा वनडे सामना – 20 जून, चेन्नई

Comments are closed.