Mumbai News – दादागिरी करायचा म्हणून मित्रांनी अल्पवयीन मित्राचा काटा काढला, हत्या करून अपघाताचा बनाव
मुंबईतील भांडुप परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादागिरी करायचा म्हणून अल्पवयीन मित्रांनी आठवीच्या विद्यार्थ्याची हत्या केली. या घटनेमुळे भांडुप परिसरात एकच खळबळ उडाली. हत्या केल्यानंतर मृतदेह तलावात फेकला आणि अपघाती मृत्यूचा बनाव केला. मात्र शवविच्छेदन अहवालामुळे हा बनाव उघड झाला. भांडुप पोलिसांनी तीन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सिद्धार्थ लोंढे असे मयत मुलाचे नाव आहे. भांडुपमधील तुळशेत पाड्यात 22 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ खेळायला जातो सांगून घरातून गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतल्याने पालकांनी शोधाशोध केली, मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी भांडुप पोलीस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी सिद्धार्थचा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी मुलुंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहार तलावात सिद्धार्थचा मृतदेह सापडला. सुरूवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात फुफ्फुस आणि पोटात पाणी नसल्याचे नमूद केले नव्हते. तसेच सिद्धार्थच्या डोक्याच्या मागील बाजूला दुखापत आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. यावरून पोलिसांनी घातपाताच्या दृष्टीने तपास सुरू केला.
तपासचक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी सिद्धार्थला ज्या मित्रासोबत शेवटचे पाहिले होते त्याला ताब्यात घेतले. आरोपीने चौघे मित्र पोहायला गेले असता सिद्धार्थ बुडाल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी तिघांची स्वतंत्र चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं. सिद्धार्थ आपल्यावर दादागिरी करायचा म्हणून आपण त्याची हत्या करून मृतदेह तलावात फेकल्याचे तिघांनी कबूल केले. भांडुप पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.