“संजूच्या 97 धावा जितक्या महत्वाच्या, तितकेच शिवमने मारलेले चौकार…” हेड कोच गंभीरचे चकित करणारे विधान

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर-८ सामना जो उपांत्य फेरीसाठी महत्वाचा होता तो रविवारी (१ मार्च) खेळला गेला. कोलकातामध्ये झालेल्या या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला. यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे चकीत करणारे विधान समोर आले आहे. यांच्या मते संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्वाचे मग ते मोठे असो वा छोटे, असे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी शिवम दुबेने शेवटच्या षटकात मारलेल्या दोन चौकारांचा उल्लेख केला आहे.

गंभीरने म्हटले, “आपण मागील काही वर्षांपासून केवळ काही विशेष खेळीबाबतच बोलत आलो आहोत. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि तो सांघिकच राहणार. माझ्यासाठी शिवमचे ते दोन चौकार तेवढेच महत्वाचे जेवढे संजूच्या ९७ धावा. कारण त्याने ते चौकार मारले नसते तर संजूच्या खेळीची कोणीच चर्चा केली नसती.”

“मोठ्या योगदानाची चर्चा होते, मात्र छोटे योगदानही महत्वाचे असतात. कारण ते संघाला विजय मिळवण्यात मदत करतात आणि लक्ष्याच्या जवळ नेतात. आमची पुढेही अशीच नीति असणार आहे,” असे गंभीरने म्हटले आहे.

“खरे म्हटले तर मला आकडेवारीवर विश्वास नाही. मी कधीच आकडेवारी पाहिली नाही. मला तर हे पण माहित नाही आकडेवारी नेमकी असते काय. मला जसे वाटले तसे मी कर्णधाराची मदत करतो. शेवटी त्यालाच निर्णय घ्यायचे आहेत. आकडेवारीत नेहमी चढ-उतार होत असते, त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास नाही,” असेही गंभीर म्हणाले आहेत.

भारत या स्पर्धेत आता इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. याबाबत गंभीर म्हणाले, “इंग्लंड सर्वोत्तम संघांपैकी उत्तम संघ आहे. आमच्याकडेही उत्तम खेळाडू आहेत, मात्र वानखेडेवर होणारा सामना सोपा नसणार. त्यामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.”

हा सामना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टी२० विश्वचषकात हे दोन्ही संघात दोनदा उपांत्य फेरीत समोरा-समोर आले आहेत. टी२० विश्वचषक २०२२मध्ये उपांत्य फेरीत हे दोन भिडले होते. तो सामना इंग्लंडने १० विकेट्सने जिंकला आणि पुढे विजेतेपदही जिंकले. २०२४मध्ये पुन्हा हे संघ उपांत्य फेरीत समोरा-समोर आले होते.

Comments are closed.