केवळ 5 धावा करताच जोस बटलर मोडणार विराट कोहलीचा विक्रम; रचणार नवा इतिहास!

​टी20 वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) (5 मार्च) रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात आमना-सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे मैदानावर खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ फायनलचे तिकीट मिळवेल, तर पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. सध्या सर्वांच्या नजरा जोस बटलरवर खिळल्या आहेत, कारण तो केवळ 5 धावा करताच विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडीत काढणार आहे. मात्र, सध्या बटलर खराब फॉर्ममधून जात आहे.

​वास्तविक, बटलरने 5 धावा करताच तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या भारत-इंग्लंड टी20 सामन्यांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्ध 21 डावांमध्ये 38.11 च्या सरासरीने आणि 135 च्या स्ट्राइक रेटने 648 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 5 अर्धशतकेही झळकावली आहेत. दुसरीकडे, जोस बटलरने 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 32.2 च्या सरासरीने आणि 143.75 च्या स्ट्राइक रेटने 644 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत, उपांत्य फेरीच्या सामन्यात 5 धावा करताच बटलर कोहलीच्या पुढे जाईल.

​टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बटलरची बॅट आतापर्यंत शांतच आहे. त्याने या स्पर्धेत एकही मोठी खेळी केलेली नाही. सात डावांमध्ये त्याने 8.85 च्या अत्यंत खराब सरासरीने आणि 106.89 च्या स्ट्राइक रेटने केवळ 62 धावा केल्या आहेत. असे असले तरी, भारता विरुद्ध बटलरचा वैयक्तिक रेकॉर्ड उत्तम आहे. टी20 मध्ये भारता विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू आहे.

​बटलरने टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये नेपाळविरुद्ध 26, वेस्ट इंडिजविरुद्ध 21, स्कॉटलंडविरुद्ध 3, इटलीविरुद्ध 3, श्रीलंकाविरुद्ध 7, पाकिस्तानविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 0 धावा केल्या होत्या. त्यामुळे उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी त्याने फॉर्ममध्ये परतणे इंग्लंडसाठी अत्यंत आवश्यक आहे.

Comments are closed.