तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भगेरिया केमिकलमध्ये ऑलियम वायू गळती; परिसरात खळबळ
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील डी-17 वरील भगेरिया केमिकल या कारखान्यात आज दुपारी ऑलियम या विषारी वायूची गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी सुमारे 1 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ही गळती सुरू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वायू गळतीची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ हालचाल करत परिसरातील इतर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही केली. तसेच संबंधित कारखान्यातील कामगारांनाही खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही; मात्र काही कामगारांना किरकोळ त्रास जाणवल्याची चर्चा परिसरात आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले असून वायूगळती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बोईसर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Comments are closed.