संजू सॅमसनच्या 97 धावा आणि शिवम दुबेचे 2 चौकार माझ्यासाठी सारखेच; भारताच्या विजयानंतर गौतम गंभीरचं विधान चर्चेत!

2026 टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताला पोहोचवण्यात संजू सॅमसनचा (Sanju Samson) सिंहाचा वाटा आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजूने 50 चेंडूत नाबाद 97 धावांची खेळी केली. मात्र, भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir Coach of team india) यांनी संजूच्या या खेळीची तुलना चक्क शिवम दुबेच्या दोन चौकांशी केली आहे.

या सामन्यात संजू व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. शिवम दुबेने 4 चेंडूत 2 चौकार मारत 8 धावा केल्या. मात्र, हे चौकार अत्यंत मोक्याच्या क्षणी आल्याचे सांगत गंभीरने मोठे विधान केले.

सेमीफायनलमधील प्रवेशानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गंभीर म्हणाले, माझ्यासाठी शिवम दुबेचे ते दोन महत्त्वाचे चौकार संजू सॅमसनच्या 97 धावांइतकेच मोलाचे आहेत. कारण, जर त्याने ते चौकार मारले नसते, तर कदाचित आज त्या 97 धावांची चर्चाही झाली नसती. त्यामुळे त्याचे ते छोटे योगदान खूप खास होते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि तो नेहमी तसाच राहील. आकड्यांविषयी बोलताना गंभीर पुढे म्हणाले, खरं सांगायचं तर माझा आकड्यांवर विश्वास नाही. मी कधीच आकडे पाहत नाही. आकडे काय असतात हे ही मला माहित नाही. माझा त्यावर अजिबात विश्वास नाही, कारण मला वाटते की खेळ हा परिस्थितीनुसार आणि तुमच्या नैसर्गिक कौशल्यावर अवलंबून असतो.

सेमीफायनलमध्ये भारताची लढत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी होणार आहे. या सामन्याबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, इंग्लंड हा एक जागतिक दर्जाचा संघ आहे. त्यांच्याकडे अनेक दिग्गज खेळाडू आहेत. वानखेडेवर खेळणे सोपे नसते हे आपल्याला ठाऊक आहे. आशा आहे की आम्ही तिथे चांगली कामगिरी करू.

Comments are closed.