ओडिशातील आणखी दोन जिल्हे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले

बोलंगीर, बारगडसह आता एकूण संख्या 7 वर

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

ओडिशातील बोलंगीर आणि बारगड हे आणखी दोन जिल्हे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहेत. ओडिशा पोलिसांनी 15 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे वृत्त दिल्यामुळे हे जिल्हे नक्षलमुक्त झाले आहेत. या घोषणेसह ओडिशातील नक्षलमुक्त जिह्यांची संख्या सात झाली आहे. नुआपाडा, नबरंगपूर, कोरापूट, मलकानगिरी, बौध, बोलंगीर आणि बारगड हे जिल्हे पूर्णपणे नक्षलमुक्त झाले असून कंधमाल, रायगडा आणि कालाहांडी जिह्यांमध्ये नक्षलवादी कारवाया सुरू आहेत.

बारगडच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडच्या महासमुंद जिह्यात नुकतेच 15 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. हे नक्षलवादी बारांगीर-बोलंगीर-महासमुंद पट्ट्यात सक्रीय होते. राज्यात दीर्घकाळ चाललेल्या संयुक्त नक्षलविरोधी कारवायांना मिळालेले हे एक मोठे यश असल्याचे डीजीपी वाय. बी. खुरानिया यांनी सांगितले. सद्यस्थितीत राज्यात केवळ 25 च्या आसपास नक्षलवादी सक्रीय असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आली.

Comments are closed.