भारताने कॅनडासोबत युरेनियम करार केला

पंतप्रधान मोदी आणि मार्क कर्नी यांच्यात वाटाघाटी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारताच्या दौऱ्यावर असलेले कॅनडाचे नेते मार्क कर्नी यांची प्रदीर्घ चर्चा झाली आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दोन्ही देशांमध्ये युरेनियमसंबंधी महत्वाचा करार झाला असून कॅनडा भारताच्या अणुवीज निर्मितीशाठी युरेनियमचा पुरवठा करणार आहे. भारताच्या दृष्टीने ही घडामोड अत्यंत महत्वाची आहे.

दोन्ही देश लवकरच सर्वंकष आर्थिक भागीदारी करारही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मार्क कर्नी यांच्यातील चर्चेनंतर या दोन्ही करारांचे मार्ग मोकळे झाले आहेत. सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यूर्पर्वेत युद्ध होत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंबंधीही दोन्ही नेत्यांनी व्यापक चर्चा केली आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपावा आणि शांतता तसेच सौहार्दाच्या मार्गाने चर्चा करुन समस्यांवर तोडगा निघावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

दोन्ही देशांमध्ये अनेक करार

युरेनियमच्या पुरवठ्यासंबंधीच्या करारासह दोन्ही देशांमध्ये या चर्चेनंतर अनेक करार करण्यात आले आहेत. त्यांच्यात दुर्मिळ धातू उत्पादनासंबंधीच्या कराराचाही समावेश आहे. अणुवीज निर्मितीसाठी लहान आकाराच्या मॉड्यूलर अणुभट्ट्यांच्या सहनिर्मितीचाही करार करण्यात आला आहे. मोठ्या आकाराच्या अत्याधुनिक अणुभट्ट्या निर्माण करण्यासाठीच्या करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

लोकशाहीवर प्रगाढ विश्वास

भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांचा लोकशाही व्यवस्थेवर प्रगाढ विश्वास आहे. दोन्ही देश बहुविधतेवर भर देतात. मानवतेचे कल्याण या संकल्पनेवरही दोन्ही देश समसमान भर देतात. दोन्ही देश या तत्वांना मानत असल्याने त्यांच्यात व्यापक आणि घनिष्ट परस्पर सहकार्य वाढविण्यास मोठा वाव आहे. दोन्ही नेत्यांच्या चर्चेत याच मुद्द्यांवर भर देण्यात आला, अशी माहिती देण्यात आली.

संरक्षण उद्योगात सहकार्य

भारत आणि कॅनडा यांनी संरक्षण उद्योगातही एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण सामग्री निर्मितीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचेही आदान-प्रदान करण्यात येणार आहे. सागरी क्षेत्रांची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व या क्षेत्रातही दोन्ही देश एकमेकांच्या समवेत कार्य करणार आहेत. या संदर्भात भारतासाठी कॅनडाचे सहकार्य अतिशय महत्वाचे ठरणार आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

भारताशी भागीदारी मौल्यवान

भारताशी मैत्री, सहकार्य आणि भागीदारीला कॅनडा सर्वाधिक महत्व देत आहे. भारत आमच्यासाठी मोलाचा मित्रदेश आहे. दोन्ही देश एकमेकांसह प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत. जागतिक शांतता आणि स्थैर्य यासाठी आम्ही कार्य करत आहोत, अशी प्रतिक्रिया मार्क कर्नी यांच्याकडून व्यक्त केली गेली.

दहशतवादाशी संघर्ष करणार

कॅनडामध्ये खलिस्तानवादी दशहतवाद्यांना आश्रय दिला जातो, असा भारताचा आरोप आहे. मार्क कर्नी यांनी भारताची ही भूमिका समजून घेतली असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आजवर कॅनडा खलिस्तानवादी शीख दहशतवादाला स्वातंत्र्याची भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून पहात होता. तथापि, हा दृष्टीकोन यापुढे असणार नाही. कॅनडातून खलिस्तानवादी दहशतवादाला मिळणारी सहानुभूती संपविली जाणार आहे. कॅनडाच्या धोरणात झालेले हे परिवर्तन भारतासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. कॅनडाने आपल्या  भूमीवर खलिस्तानवादी दहशतवादाला स्थान न दिल्यास भारताचे काम सोपे होणार आहे. कॅनडाचे माजी अध्यक्ष जस्टीन ट्रूडो यांनी खलिस्तानवादी दहशतवादाकडे दुर्लक्ष केले होते. तथापि, आता कॅनडाच्या भूमिकेत मोठे परिवर्तन होत आहे.

अनेक करारांवर स्वाक्षऱ्या

ड द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर भारत आणि कॅनडाचा भर

ड युरेनियम पुरवठ्यासह संरक्षण सामग्री निर्मितीतही सहकार्य केले जाणार

ड दहशतवाद आणि जागतिक अशांतता यांच्याविरोधात दोन्ही देश एकत्र

Comments are closed.