Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Sangeet: पहाटे ४ वाजेपर्यंत रंगला डान्सचा थरार, पाहा काही खास क्षणांची खास झलक!
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो एकामागून एक शेअर करत आहेत. मंगळवारी सकाळी, त्यांच्या बहुप्रतिक्षित रिसेप्शनच्या आदल्या दिवशी, रश्मिका आणि विजयने त्यांच्या संगीत सोहळ्याचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
रश्मिका आणि विजय २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमधील ‘आयटीसी मेमेंटोज’ (ITC Mementos) येथे कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकले. त्याआधी २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी हॉटेलमध्ये नातेवाईक आणि मित्रांसाठी एका धम्माल संगीत सोहळ्याचे आयोजन केले होते.
संगीत सोहळ्यासाठी रश्मिका आणि विजयने प्रसिद्ध डिझायनर जोडी ‘फाल्गुनी शेन पीकॉक’ यांनी तयार केलेले खास पोशाख परिधान केले होते. रश्मिकाने चंदेरी रंगाचा (Silver) लेहंगा परिधान केला होता, तर विजयने मण्यांनी जडलेल्या काळ्या रंगाच्या पोशाखात आपला जलवा दाखवला. दोघांनीही लांब केप (Cape) परिधान केल्यामुळे त्यांच्या पेहराव अगदी राजेशाही वाटत होता.
त्यांचे हे फोटो एकमेकांबद्दलचे प्रेम, त्यांचा इतक्या वर्षांचा सहवास आणि एकमेकांच्या कुटुंबातील घट्ट बंध याची साक्ष देतात. एका फॅमिली फोटोमध्ये विजय, त्याचे आई-वडील आणि भाऊ आनंद, तसेच रश्मिका, तिचे आई-वडील आणि लहान बहीण शिमान मंदाना एकत्र दिसत आहेत.
रश्मिकाने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘प्रेम, आनंदाश्रू, हास्य, संगीत आणि आम्ही रात्रभर केलेल्या डान्सने भरलेली ही रात्र होती. ही खरोखरच आतापर्यंतची सर्वात आनंददायी रात्र होती! मी आणि विजूने एकमेकांना सरप्राईज देण्यापासून.. कुटुंबाने आम्हाला सरप्राईज देण्यापर्यंत.. आणि आमचे कुटुंब इतके मुक्तपणे आणि छान डान्स करताना पाहून आम्ही पूर्णपणे थक्क झालो होतो! फाल्गुनी शेन पीकॉक.. तुमचे डिझाइन्स अप्रतिम आहेत! तो ड्रेस खूप जड होता, पण तरीही मी रात्रभर त्यात वावरले!’
‘२४.२.२६! ही ती रात्र होती जेव्हा विजय आणि मी आमच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या प्रेमाच्या साक्षीनं एकत्र डान्स केला!’, असे रश्मिकाने पुढे नमूद केले.
विजयने याबद्दल भावना व्यक्त करताना लिहिले, ‘ती संध्याकाळ डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसण्यात, पायाचे तळवे दुखेपर्यंत नाचण्यात आणि सर्वांची भाषणे व सरप्राईज पाहून भावूक होण्यात घालवली. सुंदर माणसांनी भरलेली ही एक मोठी आनंदी पार्टी होती. फाल्गुनी शेन पीकॉकच्या कपड्यांनी जादू केली होती. मी पहाटे ४ वाजेपर्यंत त्या कपड्यांमध्ये होतो’.
२६ फेब्रुवारी रोजी सकाळी विजयच्या सांस्कृतिक पद्धतीचा मान राखत तेलगू पद्धतीने आणि संध्याकाळी रश्मिकाच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान करत ‘कोडवा’ पद्धतीने या जोडीचे लग्न पार पडले. लग्नाच्या अफवांवर सुरुवातीला मौन बाळगणाऱ्या या जोडप्याने २३ फेब्रुवारीपासून प्री-वेडिंग सोहळ्याचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
या सोहळ्यांच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये पाहुण्यांसाठी जपानी डिनर, पूल व्हॉलीबॉल आणि २३ व २४ फेब्रुवारी रोजी “VIROSH प्रीमियर लीग” या नावाने खेळला गेलेला क्रिकेट सामना यांचा समावेश होता. मेमेंटोज या हिल रिसॉर्टवर मंगळवारी संध्याकाळी संगीत सोहळा पार पडला, त्यानंतर २५ फेब्रुवारीला हळद आणि मेहंदीचा घरगुती कार्यक्रम झाला.
या लग्नाला ‘ई नगरानिकी एमैनदी’चा दिग्दर्शक आणि अभिनेता तरुण भास्कर, ‘द गर्लफ्रेंड’चा दिग्दर्शक राहुल रवींद्रन, अभिनेत्री ईशा रेब्बा आणि आशिका रंगनाथ, स्टायलिस्ट श्राव्या वर्मा, ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘ॲनिमल’चा दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि ‘लोका’ स्टार कल्याणी प्रियदर्शन यांनी उपस्थिती लावली होती.
रविवारी (१ मार्च) जोडप्याच्या टीमने अधिकृत निवेदनात सांगितले की, रिसेप्शनमध्ये तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील कलाकार तसेच राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आता सुरक्षा कारणास्तव हा सोहळा केवळ निमंत्रितांपुरताच मर्यादित असेल, असे त्यांच्या टीमने स्पष्ट केले आहे.
विजय आणि रश्मिका म्हणाले, टतुमची सुरक्षितता आणि आनंद आमच्यासाठी सर्वस्व आहे. तुमच्या आशीर्वादाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. हा सोहळा सर्वांसाठी सुरक्षित आणि आनंददायी ठेवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा’. या जोडीने ४ मार्चच्या या रिसेप्शन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रित केले आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा संगीत फोटो: जोडपे पहाटे 4 पर्यंत नाचले
रश्मिका मंदण्णा आणि विजय देवराकोंडा यांनी त्यांच्या संगीत रात्रीचे ग्लॅमरस फोटो उदयपूर येथे शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नाआधीचे उत्सव आणि स्टार-स्टडेड पाहुण्यांच्या यादीबद्दल वाचा.
Comments are closed.