दुबईहून मुंबई विमानतळावर उतरले विमान, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव
इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर इराणकडून दुबईसह काही देशांवर हल्ले झाल्याचे वृत्त समोर आले असून, याचा परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर झाला आहे. अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले, तर दुबई विमानतळही काही काळासाठी बंद करण्यात आल्याने अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर दुबईला पर्यटनासाठी गेलेले अनेक प्रवासी तेथेच अडकून पडले आहेत. मंगळवार (3 मार्च) रोजी रात्री सुमारे 2 वाजता दुबईहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक उड्डाण दाखल झाले. त्यातील एका प्रवाशाने आपला अनुभव माध्यमांसमोर मांडला.
मुंबईतील अजय नावाच्या प्रवाशाने सांगितले की, ते मुंबईहून हैदराबादमार्गे दुबईला गेले होते. दुबईहून त्यांची पुढील फ्लाइट अमेरिकेसाठी होती. “आम्ही फ्लाइटमध्ये बसलो होतो, मात्र टेकऑफ होत नव्हते. सुरुवातीला काही तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. असेच 7 ते 8 तास उलटले. त्यानंतर आम्हाला युद्ध सुरू झाल्याची माहिती देण्यात आली आणि त्यामुळे उड्डाण करता येणार नसल्याचे सांगण्यात आले,” असे अजय यांनी सांगितले.
विमानतळावर गोंधळ, प्रवाशांची धावपळ
अजय यांच्या म्हणण्यानुसार, या घोषणेनंतर विमानतळावर मोठी धावपळ आणि गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यासारखी वाटत होती. त्यानंतर अमिरातच्या बस आणि गाड्या विमानतळावर आल्या आणि प्रवाशांना विविध हॉटेलमध्ये हलवण्यात आले. मात्र हॉटेल शोधताना त्यांना रात्रभर भटकंती करावी लागली.
“सुमारे 10 ते 12 तास भटकल्यानंतर आम्हाला एक हॉटेल मिळाले. त्या काळात आम्ही स्फोटांचे आवाज ऐकले. तसेच बुर्ज खलिफाच्या परिसरात धुराचे लोटही पाहिले,” असे त्यांनी सांगितले.
हॉटेलमध्ये कडक निर्बंध
अजय यांनी पुढे सांगितले की, हॉटेल प्रशासनाकडून बाहेर पडण्यास आणि खिडकीजवळ उभे राहण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. “आम्ही दुपारचे जेवण न करता खोलीतच थांबत होतो. बाहेर नेमके काय सुरू आहे, याची आम्हाला काहीच माहिती मिळत नव्हती. सर्वत्र भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण होते,” असे त्यांनी नमूद केले.
हॉटेलमध्ये खोल्या उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रवासी इतरत्र जमिनीवर किंवा लॉबीमध्येच झोपले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक उड्डाणांचे वेळापत्रक अद्याप विस्कळीत आहे.
Comments are closed.