हुरा रे हूरा… आमच्या निनावी देवीचा तुरा रे तुरा ! संगमेश्वरमध्ये निनावी देवीच्या अंगणात शिमगोत्सवाचा उत्साह
कोकणातील शिमगोत्सव म्हणजे केवळ सण नव्हे, तर देवीवरील अखंड श्रद्धा, भक्तिरस आणि सामूहिक एकात्मतेचा जिवंत सोहळा असतो. यंदा संगमेश्वरमध्ये हा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. संपूर्ण गाव देवीच्या दर्शनासाठी जमले होते. ढोल-ताशांचा गर्जना, पिपाणीच्या सुरांचे संगीत, गुलालाची रंगीबेरंगी उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. ‘हुरा रे हूरा… आमच्या निनावी देवीचा तुरा रे तुरा !’ असा जयघोष करत भक्तांनी आसमंत दणाणून सोडला.
देवीच्या माडावर झेलवत, तालासुरात नाचणारे तरुण, महिला, वृद्ध आणि बालक सर्वच भक्त भक्तिरंगात रंगून, देवीच्या चरणी आले होते. एवढ्या गर्दीतही शिस्त आणि भक्तिभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. मानकरी दत्ताराम सुर्वे आणि जयेंद्र सुर्वे यांनी आपल्या पूर्वजांच्या परंपरा जपत सोहळा पार पाडला. कोकणच्या मातीत रुजलेल्या परंपरा, देवीवरील श्रद्धा, आणि सामूहिक भक्तिरस यांचे सुंदर दर्शन या शिमगोत्सवात घडले. निनावी देवीच्या कृपेने गावावर सुख, शांती, समृद्धी आणि पवित्रतेचा वर्षाव व्हावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
Comments are closed.