रोहित-विराटचा प्लॅन 2027! 14 जूनला करणार कमबॅक, खेळणार ‘इतके’ वनडे सामने

भारताचे अनुभवी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे २०२७ वनडे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न आहे. दोघे त्या स्पर्धेची तयारी जूनपासून करणार आहेत. भारतीय संघ सध्या टी२० विश्वचषक २०२६मध्ये व्यस्त असून त्यानंतर आयपीएल सुरू होणार आहे. आयपीएलचा शेवटचा सामना ३१ मे ला खेळला जाणार आहे. त्यानंतर भारत ५ संघांविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहेत.
टी२० विश्वचषकानंतर भारताचे संपूर्ण लक्ष वनडे प्रकारावर असणार आहे. रोहित आणि विराट यांनी आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटीमधून निवृत्ती घेतली असून दोघेही केवळ वनडे सामन्यांत खेळतात. आता २०२७चा विश्वचषक जवळ आल्याने या स्पर्धेसाठी भारताची रणनीती काय असेल यावर काम सुरू आहे. त्याची सुरूवात अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेने होणार
आयपीएलनंतर अफगाणिस्तान जून महिन्यात भारताचा दौरा करणार आहे. यामध्ये एक कसोटी सामना (६ ते १० जून) खेळला जाणार आहे. तसेच तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना १४ जूनला धरमशाला, दुसरा वनडे सामना १७ जूनला लखनऊमध्ये आणि तिसरा वनडे सामना २० जूनला चेन्नईमध्ये खेळला जाणार आहे.
अफगाणिस्ताननंतर रोहित आणि विराटकडे २०२६मध्ये एकूण १२ वनडे सामने खेळण्याची संधी आहे. जुलै महिन्यात भारत इंग्लंडचा दौरा करणार आहे. यामध्येही तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना १४ जुलैला बर्मिंघममध्ये, दुसरा सामना १६ जुलैला कार्डिफ आणि तिसरा सामना १९ जुलैला लंडनमध्ये खेळला जाणार आहे. भारत ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावरही तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. यामध्येही तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. वर्षाशेवटी घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्धही तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार. याचा अर्थ एकूण १५ वनडे सामने खेळले जातील. यावरून रोहित-विराटचे भविष्य निश्चित होईल.
रोहित-विराट २०२७च्या वनडे विश्वचषकात खेळणार की नाही हे अजून स्पष्टपणे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले नाही. यावरून या मालिकांवरून विराट आणि रोहितला त्यांचा फॉर्म त्याचबरोबर फिटनेट कायम राखत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.
Comments are closed.