टीम इंडियाचा ऐतिहासिक गौरव! या प्रतिष्ठित पुरस्कारसाठी नामांकन मिळवणारा ठरला पहिला महिला क्रिकेट संघ

2025 च्या महिला एकदिवसीय (ODI) विश्वचषकावर नाव कोरणारी भारतीय महिला क्रिकेट टीम आता एका प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराच्या शर्यतीत सामील झाली आहे. विश्वविजेतेपदाच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी भारतीय संघाला ‘लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स’ (Laureus World Sports Awards) साठी नामांकन मिळाले आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघाला ‘लॉरेस टीम ऑफ द इयर’ (Laureus Team of the Year) या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे.

लॉरेस स्पोर्ट्सने मंगळवारी या नामांकनाची अधिकृत घोषणा केली असून बीसीसीआयने स्वतः ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तसेच या जागतिक पुरस्कारासाठी नामांकित होणारी भारतीय महिला टीम ही जगातील पहिलीच महिला क्रिकेट टीम ठरली आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारताने महिला वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा (339 धावा) यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने पहिले जेतेपद पटकावले.

हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील या संघाची स्पर्धा आता इंग्लंडची महिला फुटबॉल टीम, युरोपियन रायडर कप टीम, पॅरिस सेंट जर्मेन (PSG) आणि मॅकलारेन फॉर्म्युला वन टीम यांसारख्या जागतिक दिग्गज संघांशी असेल. याआधी विनेश फोगाट (2019), नीरज चोप्रा (2022) आणि ऋषभ पंत (2025) या भारतीय खेळाडूंनाच लॉरेससाठी नामांकन मिळाले होते. आता या यादीत भारतीय महिला संघाचे नाव जोडले गेले आहे.

Comments are closed.