इराणला आता चर्चा करायची आहे, पण आता खूप उशीर झालाय, डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य
आखाती देशांमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक खळबळजनक विधान केले आहे. इराणला आता अमेरिकेशी चर्चा करण्याची इच्छा आहे, मात्र आता वेळ निघून गेली असून चर्चेसाठी खूप उशीर झाला आहे, असे ट्रम्प म्हणाले आहेत. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी इराणच्या सद्यस्थितीवर आणि इस्रायल-इराण संघर्षावर भाष्य केले.
ट्रम्प यांनी दावा केला की, इराण सध्या अत्यंत दबावाखाली असून त्यांना समझोता हवा आहे. “त्यांना (इराणला) माझ्याशी बोलायचे आहे, त्यांनी तसा प्रयत्नही केला. पण मी त्यांना सांगितले की, आता खूप उशीर झाला आहे,” असे ट्रम्प यांनी सांगितले. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे इराणची अर्थव्यवस्था आणि प्रादेशिक वर्चस्व धोक्यात आले असतानाच ट्रम्प यांनी ही भूमिका घेतल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांनी इराणला इशारा देताना म्हटले की, जोपर्यंत इराण दहशतवादाला पाठिंबा देणे आणि अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेचे इराणबाबतचे धोरण अधिक कठोर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Comments are closed.