पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी खळबळ! टी20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर पहिला मोठा राजीनामा

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकला नाही. सलमान आगाच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला ग्रुप स्टेजमध्ये भारताकडून पराभव पत्करावा लागला होता आणि तेव्हापासूनच मोहसीन नकवी टीमवर नाराज होते. पाकिस्तानवर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे मोठे दडपण होते. श्रीलंका विरुद्ध त्यांना मोठ्या विजयाची गरज होती. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात विजय तर मिळवला, पण रन रेटच्या बाबतीत ते न्यूझीलंडला मागे टाकू शकले नाहीत आणि सुपर-८ मधून बाहेर पडले. पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर खेळाडूंच्या पगारात कपात केली जाईल, अशा बातम्या आल्या होत्या. दरम्यान, आता एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, निवड समितीचे वरिष्ठ सदस्य अलीम दार यांनी टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (PCB) आपला राजीनामा सोपवला आहे. टीमच्या खराब कामगिरीनंतर आलेला हा पहिला मोठा राजीनामा आहे.
न्यूज एजन्सी पीटीआय (PTI) नुसार, पीसीबीच्या जवळच्या एका विश्वासार्ह सूत्राने मंगळवारी सांगितले की, “आयसीसीचे माजी एलिट पॅनल पंच अलीम डार यांनी आपला राजीनामा पाठवला आहे, जो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही.” डार यांच्यासह माजी कसोटीपटू असद शफीक आणि आकिब जावेद हे निवड समितीचे सदस्य आहेत.
रिपोर्टनुसार, अलीम डार या गोष्टीमुळे अत्यंत संतप्त आहेत की, जेव्हा विश्वचषक संघाची निवड होत होती, तेव्हा त्यांनी बाबर आझम आणि शादाब खान यांना कोणतीही चांगली कामगिरी नसताना संघात सामील करण्यास विरोध केला होता, परंतु हेसन यांनी त्यांना संघात ठेवण्यावर भर दिला. सूत्राने सांगितले की, डार यांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले की कर्णधार सलमान आगा किंवा इतर कोणत्याही निवडकर्त्यांनी हेसन यांच्या अधिकाराला विरोध केला नाही.
”अलीम यांनी यावरही जोर दिला होता की, जर बाबर आणि शादाब यांना कामगिरी नसतानाही बोलावले जाऊ शकते, तर मोहम्मद रिझवानला त्यांच्या अनुभवामुळे उस्मान खानच्या जागी संघात घेतले पाहिजे, परंतु कोणीही त्यांना पाठिंबा दिला नाही.”
सध्या सुरू असलेल्या आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानला भारत आणि इंग्लंड सारख्या संघांकडून पराभव स्वीकारावा लागला, तर न्यूझीलंड विरुद्धचा त्यांचा सुपर-८ सामना पावसामुळे रद्द झाला. त्यांनी सुपर-८ च्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. सूत्रांनुसार, खेळाडूंच्या या कामगिरीमुळे केवळ पीसीबीच नव्हे, तर सरकारमधील प्रभावशाली व्यक्तीही नाराज आहेत.
Comments are closed.