तटरक्षक दलाला स्वदेशी हेलिकॉप्टर मिळणार
5,083 कोटीचे संरक्षण करार : रशियाकडून घातक क्षेपणास्त्रs
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने स्वत:च्या सैन्यशक्तीला आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे मंगळवारी दोन महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. एकूण 5,083 कोटी रुपयांच्या या संरक्षण व्यवहारांचा थेट प्रभाव भारताची सागरी सीमा आणि हवाई सुरक्षेवर पडणार आहे. जागतिक स्तरावर तणाव वाढत असताना आणि सागरी सुरक्षा एक मोठे आव्हान ठरले असताना सरकारने हे पाऊल उचलले आहे.
या संरक्षण क्यवहाराचा पहिला हिस्सा हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत झाला आहे. याच्या अंतर्गत 2,901 कोटी रुपयांच्या निधीतून 6 अॅडव्हान्स्ड लाइट (ध्रूव) हेलिकॉप्टर्स (एएलएच एमके-3) भारतीय तटरक्षक दलासाठी खरेदी करण्यात येणार आहेत. ही हेलिकॉप्टर्स सागरी देखरेख, मच्छीमारांची सुरक्षा आणि पर्यावरणाच्या देखरेखीत गेमचेंजर ठरणार आहेत. या प्रकल्पामुळे 200 एमएसएमईंना लाभ होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हा मैलाचा दगड ठरेल.
रशियन क्षेपणास्त्रांनी सज्ज होणार युद्धनौका
दुसरा करार भारतीय नौदलाच्या हवाई सुरक्षेला मजबूत करण्यासाठी करण्यात आला आहे. 2,182 कोटी रुपयांच्या खर्चाद्वारे रशियन कंपनी रोसोबोरोनएक्सपोर्टसोबत ‘वर्टिकल लाँच श्टिल’ क्षेपणास्त्रांचा करार झाला आहे. ही क्षेपणास्त्रs युद्धनौकांवर तैनात केली जाणार असून ती शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रांना क्षणार्धात नष्ट करण्याची क्षमता बाळगून आहेत. यामुळे नौदलाची शक्ती वाढण्यासोबत भारत आणि रशियाच्या संरक्षण भागीदारीलाही नवी ऊर्जा मिळणार आहे.
Comments are closed.