इराणवर हल्ला करण्याकडे पंतप्रधानांनी डोळेझाक केली
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचा आरोप : खामेनेईंच्या हत्येवर भारताचे मौन अस्वस्थ करणारे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येवर भारत सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीचे मौन अस्वस्थ करणारे आहे, ही तटस्थता नव्हे तर जबाबदारीपासून मागे हटणे असल्याचा आरोप सोनिया यांनी केला. सोनिया गांधींनी एका लेखात याप्रकरणी मोदी सरकारला मंगळवारी लक्ष्य केले आहे.
खामेनेई यांच्या हत्येची भारत सरकारने निंदा केली नाही तसेच इराणच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनावर कुठलीच स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधान मोदींनी अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याकडे डोळेझाक केली, तर केवळ युएईवरील इराणच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईची निंदा केली. त्यानंतर पंतप्रधानांनी ‘तीव्र चिंता’ आणि ‘चर्चा तसेच कूटनीति’चा मार्ग अवलंबिण्याचे आवाहन केल्याचे सोनिया गांधींनी लेखात नमूद केले.
युद्धघोषणेशिवाय हत्या
खामेनेई यांची हत्या कुठल्याही औपचारिक युद्धाच्या घोषणेशिवाय झाली आणि ती देखील चर्चेची प्रक्रिया सुरू असताना करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ चार्टरच्या अनुच्छेद 2 (4) नुसार कुठल्याही देशाच्या सीमा किंवा त्याच्या राजकीय स्वातंत्र्याच्या विरोधात बळाचा वापर गैर आहे. कुठल्याही वर्तमान राष्ट्रप्रमुखाचे टार्गेट किलिंग या नियमांच्या विरोधात आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही या प्रकरणी आवाज उठवत नसेल तर आंतरराष्ट्रीय नियम कमकुवत ठरू शकतात, असे सोनिया गांधींनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांचा इस्रायल दौरा
खामेनेई यांच्या हत्येच्या केवळ 48 तासांपूर्वी पंतप्रधान मोदी हे इस्रायल दौऱ्यावरून परतले होते. तेथे त्यांनी बेंजामीन नेतान्याहू सरकारच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. गाझा संघर्षात मोठ्या संख्येत जीवितहानी झाल्याने जगभरात नाराजी असताना मोदींचा हा दौरा झाल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला आहे.
ग्लोबल साउथ अन् ब्रिक्स देशांची भूमिका
ग्लोबल साउथचे अनेक देश आणि ब्रिक्सचे भागीदारी रशिया आणि चीनने या प्रकरणी अंतर राखलेले असताना भारताचे कुठल्याही नैतिक भूमिकेशिवाय खुले समर्थन चुकीचा संदेश देणारे आहे. याचा प्रभाव केवळ क्षेत्रीय राजकारणापुरता मर्यादित राहणार असून जगभरात दिसणार असल्याचा दावा सोनिया गांधींनी केला आहे.
बॉम्बवर्षाव अन् टार्गेट किलिंगची निंदा
इराणच्या भूमीवर झालेला बॉम्बवर्षाव आणि टार्गेट किलिंगची काँग्रेस निंदा करतो. हा प्रकार जगासाठी धोकादायक आहे. इराणची जनता आणि जगभरातील शिया समुदायाबद्दल काँग्रेस संवेदना व्यक्त करत असल्याचे सोनिया गांधींनी लेखात नमूद पेले आहे.
भारत-इराण संबंधांचा उल्लेख
1994 साली ओआयसीच्या काही देशांनी संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार आयोगात काश्मीर मुद्द्यावर भारताच्या विरोधात प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला असता इराणने महत्त्वाची भूमिका पार पाडत तो रोखला होता, यामुळे काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत येण्यापासून थांबला होता. इराणने पाकिस्तान सीमेनजीक भारताच्या कूटनीतिक उपस्थितीला मंजुरी दिली होती, जी ग्वादार बंदर आणि चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉरच्या संतुलनाच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण आहे. एप्रिल 2001 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तेहरान दौऱ्यात दृढ द्विपक्षीय संबंधांना अधोरेखित केले हेते, असे सोनिया गांधींच्या लेखात म्हटले गेले आहे.
संसदेत चर्चेची मागणी
संसदेच्या अधिवेशनात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचे टार्गेट किलिंग, त्या प्रकरणी भारत सरकारचे मौन आणि यामुळे आंतरराष्ट्रीय कायदा-सार्वभौमत्वाचे तत्त्व कमकुवत होण्याच्या मुद्द्यावर खुली चर्चा व्हायला हवी. आंतरराष्ट्रीय मापदंडांचा विनाश आणि पश्चिम आशियात वाढती अस्थिरता भारताच्या रणनीतिक आणि नैतिक हितांशी जोडलेली असल्याचे सोनिया गांधींनी म्हटले आहे.
Comments are closed.