मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आसामच्या ऑर्थोडॉक्स चहा निर्यातीला ब्रेक
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचे पडसाद आता हिंदुस्थानातील चहा उद्योगावर उमटू लागले आहेत. विशेषतः आसामच्या ऑर्थोडॉक्स चहाच्या निर्यातीबाबत उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत इराणसह मध्य पूर्वेतील देशांमध्ये आसामच्या ऑर्थोडॉक्स चहाने मजबूत बाजारपेठ निर्माण केली होती. मात्र सध्याची अस्थिर परिस्थिती या वाढीच्या प्रवासात अडथळा ठरू शकते.
गुवाहाटी चहा आॅक्शन बायर्स असोसिएशन (GTABA) ने निवेदनात सांगितले की, हिंदुस्थानी ऑर्थोडॉक्स चहाच्या निर्यातीवर चालू तणावाचा संभाव्य परिणाम होऊ शकतो. संघटनेचे सचिव दिनेश बिहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानने अलीकडेच विक्रमी २८० दशलक्ष किलोग्रॅम चहा निर्यात केला होता. त्यापैकी सुमारे १२२.५० दशलक्ष किलोग्रॅम चहा पूर्व आशियाई देशांकडे गेला आहे. गेल्या वर्षी इराणकडून ऑर्थोडॉक्स चहासाठी चांगले उत्पन्न मिळाले होते; मात्र सध्याच्या परिस्थितीत पेमेंट, शिपमेंट आणि लॉजिस्टिक्स संदर्भात अनिश्चितता वाढली आहे.
उत्पादनाच्या आघाडीवर सध्या तातडीचे संकट नसले तरी पुढील काही महिने निर्णायक ठरणार आहेत. आसाममध्ये अजून पावसाची प्रतीक्षा असून मार्च-एप्रिलपासून उत्पादनाला वेग येण्याची शक्यता आहे. जर त्या काळात मध्य पूर्वेतील बाजारपेठ अस्थिर राहिली, तर मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या ऑर्थोडॉक्स चहाला बाजारपेठ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
गेल्या वर्षी ऑर्थोडॉक्स चहाला सीटीसीपेक्षा प्रतिकिलो ४० ते ५० रुपये अधिक दर मिळत असल्याने अनेक उत्पादकांनी सीटीसीऐवजी ऑर्थोडॉक्स उत्पादनाकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती बिकट झाल्यास उत्पादकांना पुन्हा सीटीसीकडे वळावे लागू शकते. देशांतर्गत बाजारात सीटीसीची मागणी मजबूत असली तरी त्याच्या किमती गेल्या दोन-तीन वर्षांपासून स्थिर आहेत. केवळ इतकेच नाही तर, आता लॉजिस्टिक पातळीवरही अडचणी वाढल्या आहेत. संघर्षामुळे विमा प्रीमियम आणि शिपिंग खर्चात वाढ झाली आहे. काही कन्साइनमेंट बंदरांवर अडकल्या असून पेमेंटबाबत स्पष्टता नसल्याने व्यापारी साशंक आहेत. पर्यायी व्यापार मार्ग अधिक खर्चिक आणि जोखमीचे ठरत आहेत.
दरम्यान, आसाम सरकारने मागील वर्षी ऑर्थोडॉक्स चहावर १० टक्के अनुदान देत या विभागाला चालना दिली होती. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. मात्र आंतरराष्ट्रीय अस्थिरतेमुळे ही वाढ टिकून राहील का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूणच, मध्यपूर्वेतील तणाव दीर्घकाळ टिकल्यास आसामच्या ऑर्थोडॉक्स चहा निर्यातीच्या वाढीला ब्रेक लागू शकतो. उद्योग आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून पुढील रणनीती आखत आहे.
Comments are closed.