AUSvsIND: भारताला मोठा झटका! वेगवान गोलंदाज पिंक बॉल टेस्टमधून बाहेर, ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला मिळाली संधी

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. अशातच भारताला मंगळवारी (३ मार्च) मोठा धक्का बसला. त्यांची अनुभवी वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकुर या एकमात्र कसोटीतून बाहेर झाली आहे. तिच्या कामाचे अधिक चांगले व्यवस्थापन होण्यासाठी रेणुकाला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ती पिंक बॉल कसोटीच्या निवडीसाठी उपलब्ध राहणार नाही. तसेच बीसीसीआयचा मेडिकल स्टाफ तिच्या फिटनेसवर लक्ष देत आहे.
रेणुकाच्याजागी २२ वर्षीय काशवी गौतमला संधी देण्यात आली आहे. काशवी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेचाही भाग होती. रेणुकाच्या अनुपस्थितीबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “भारतीय संघाची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकुर पर्थमध्ये होणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यातून बाहेर झाली आहे. तिच्या वर्कलोडचे (कामाचे) व्यवस्थापन करण्यासाठी तिला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.”
हा कसोटी सामना ६ मार्चपासून सुरू होणार आहे. भारतासाठी केवळ ६ वनडे सामने खेळलेल्या काशवीचे हे कसोटी पदार्पण असेल. तिने महिला प्रीमियर लीगमध्ये १८ सामने खेळले आहेत. त्यामध्ये गुजरात जायंट्सकडून खेळताना काशवीने १९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तिने या दौऱ्यात खेळलेल्या तीन वनडे सामन्यात ३ विकेट्स घेत ६८ धावाही केल्या आहेत.
भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी२० मालिका २-१ अशी जिंकली होती, मात्र वनडे मालिकेत निराशा केली. तीन सामन्यांची ती वनडे मालिका भारताने ३-० अशी गमावली.
रेणुकाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन टी२० सामन्यात खेळताना ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर दोन वनडेमध्ये एक विकेट घेतली होती आणि दुसरा वनडे सामना खेळला नव्हता. तिच्या अनुपस्थितीने भारताच्या वेगवान गोलंदाजीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काशवीने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तसेच क्रांति गौड, सायली सातघरे आणि अमनजीत कौर यांनाही कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही.
Comments are closed.