नवी मुंबई आणि मुंबई विमानतळांदरम्यान मेट्रो मार्गासाठी 27.2 हेक्टर खारफुटीवर कुऱ्हाड, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई आणि मुंबई विमानतळांदरम्यान मेट्रो मार्गासाठी, राज्य सरकारने 24 फेब्रुवारीला दोन्ही विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो 8 मार्गाला मंजुरी दिली. या प्रकल्पात आंतरराज्य बस टर्मिनलजवळ एक कारशेड देखील असणार आहे. या मार्गादरम्यान येणाऱ्या 27.2 हेक्टर क्षेत्रपळावरील खारफुटीच्या जंगलावर कुऱ्हाड येणार आहे. यामुळेच आता पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, नगरविकास विभागाकडून या जमिनीच्या हस्तांतरणासाठी मान्यता देण्यात आली आहे.

यासंदर्भात सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा भूखंड मेट्रो २ बी च्या मंडाले कार डेपोच्या शेजारी होता. मेट्रो कारशेडसाठी यापूर्वी घेतलेल्या पर्यावरणपूरक निर्णयांना कार्यकर्त्यांनी आणि स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. आरे जंगलात मेट्रो ३ कारशेड बांधण्याचा निर्णय हा एक मोठा वादाचा मुद्दा होता. इतकेच नाही तर भाईंदर येथे कार डेपो बांधण्याची योजनाही मागे घ्यावी लागली होती. यामुळे शेकडो झाडे तोडावी लागली असती. मेट्रो 8 मंडालेच्या प्रस्तावामुळेही पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी, संपूर्ण प्रक्रियेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि काम सुरू करण्यापूर्वी ते विविध अधिकाऱ्यांकडून परवानगी देखील घेतील असे म्हटले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले आणि ते २५ डिसेंबर २०२५ ला कार्यान्वित झाले. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जाण्यासाठी, सरकारने मेट्रो 8 ला यासाठी मान्यता दिली. यांतर्गत २०२१ मध्ये ठाणे खाडीमार्गे मेट्रो कनेक्शनची आवश्यकता देखील अधोरेखित करण्यात आली होती.

नवी मुंबईचा जलद विकास आणि दोन्ही शहरांमधील प्रवाशांची वाढती संख्या पाहता, भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडण्याची शक्यता आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात वनशक्तीचे डी. स्टॅलिन म्हणाले. “मेट्रो डेपो झोपडपट्टीच्या जमिनीवर का स्थलांतरित केला जाऊ शकत नाही, जिथे झोपडपट्टीवासीयांना योग्य मोबदल्यांतर्गत घरे देखील मिळतील आणि सरकारी जमिनीचा चांगला वापर करता येईल.”

पर्यावरणवादी नंदकुमार पवार पुढे म्हणाले, “खारफुटी काढून टाकल्यामुळे आपले आधीच नुकसान झाले आहे. सरकारने पर्यायी जागा शोधाव्यात. कोणत्याही परिस्थितीत खारफुटी किंवा झाडे तोडू नयेत.” खारफुटीसंदर्भात बोलताना, स्टॅलिन म्हणाले पायाभूत सुविधांसाठी जंगल आणि खारफुटीची जमीन बेपर्वाईने नष्ट केली जात आहे. “पूर्वी कोस्टल रोड आणि सीवेज ट्रीटमेंटसाठी मालाड खाडी, कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंडसाठी ठाणे खाडी आणि आता मेट्रोसाठी मंडाले,” ते म्हणाले. “जर प्रत्येक प्रकल्पासाठी वनजमीन सोपवली जात असेल, तर पुढील पाच वर्षांत मुंबईतील सर्व खारफुटीची जंगले नष्ट होतील.”

Comments are closed.