T20 WC26 Semi-Final: वानखेडे स्टेडियमवर कोणाचा वरचष्मा, भारत की इंग्लंड? एकदा आकडेवारी पाहाच

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आता उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड असा कोलकातामध्ये ४ मार्चला खेळला जाणार आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना दोन वेळेचे टी२० विश्वचषक विजेते भारत विरुद्ध इंग्लंड असा आहे. हा सामना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी या मैदानावर जेव्हा हे संघ समोरा-समोर आले तेव्हा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवर एकदा नजर टाकू आणि काही खास आकडेवारी जाणून घेऊ.
मुंबईच्या या मैदानावर भारताची टी२० मधील कामगिरी उत्तम आहे. भारताने येथे ७ सामने खेळले असून ५ सामने जिंकले आहेत, तर दोन सामन्यांत पराभव झाला. याच मैदानावर भारताने इंग्लंडविरुद्ध २४७ धावसंख्येचा डोंगर उभा केला होता. संघाच्या दृष्टीने ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. त्यावेळी इंग्लंड केवळ ९७ धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला आणि भारत १५० धावांनी जिंकला.
वानखेडे स्टेडियमवरील काही विक्रम
सर्वाधिक धावा – विराट कोहलीने ३ सामन्यात १९७च्या सरासरीने १९७ धावा केल्या आहेत.
सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या – अभिषेक शर्माने २०२५मध्ये इंग्लंडविरुद्ध जबरदस्त खेळी केली होती. त्याने ५४ चेंडूत १३ षटकार आणि ७ चौकार मारत १३५ धावा केल्या होत्या.
सर्वाधिक शतके – अभिषेक शर्मा (२ सामन्यात एक शतक)
सर्वाधिक अर्धशतके – विराट कोहली (३ सामन्यात २ अर्धशतके)
सर्वात मोठी भागीदारी – केएल राहुल-रोहित शर्मा जोडीने विरुद्ध वेस्ट इंडिज १३५ धावांची भागीदारी केली होती.
सर्वाधिक वेळा शून्यावर बाद – पियुष चावला, ऋषभ पंत, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा
भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वामध्ये खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत.
सर्वाधिक विकेट्स – मोहम्मद शमी (२ सामने ५ विकेट्स)
सर्वोत्तम गोलंदाजी – शिवम मवीने श्रीलंकेविरुद्ध ४ षटकात २२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
भारत आणि इंग्लंड तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत समोरा-समोर येत आहेत. २०२२मध्ये इंग्लंडने भारताला आणि २०२४मध्ये भारताने इंग्लंडला पराभूत केले होते. आताचे संघ पाहता दोन्ही तुलनेने समानच असून ५ मार्चला चाहत्यांना थरारक सामना पाहायला मिळेल.
Comments are closed.