तुमचे सेफ्टी रेकॉर्ड तपासा! ChatGPT आणि Grok मध्ये जोरदार भांडण; आरोपप्रत्यारोपांच्या फैरी
AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात दररोज नवनवीन गोष्टी विकसित होत असल्याने मानवी जीवन सुलभ होत असले तरी त्याचे काही गंभीर परिणाम देखील समोर येत आहेत. अशातच AI क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आपली AI प्रणाली किती चांगली आहे तर दुसऱ्याची खराब असे प्रकार सध्या वाढले आहेत. ओपन एआय आणि ग्रोक या दोन AI प्लॅटफॉर्मच्या प्रमुखांमध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ओपनएआय’ (OpenAI) सध्या एका मोठ्या कायदेशीर पेचात अडकली आहे. ‘चॅटजीपीटी’च्या हाताळणीमुळे अनेक युजर्सच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाले असून, काही प्रकरणांमध्ये हे मृत्यूला (जीवन संपवण्यास) कारणीभूत ठरल्याचा खळबळजनक आरोप अनेक खटल्यांमधून करण्यात आला आहे. टेक क्षेत्रातील दिग्गज एलन मस्क यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले आहे की, हे खटले त्यांचा तोच युक्तिवाद अधोरेखित करतात, ज्यात त्यांनी म्हटले होते की ओपनएआयने नफा आणि वेग मिळवण्यासाठी सुरक्षेशी तडजोड केली आहे.
मस्क यांचा ‘ग्रोक’ वादाच्या भोवऱ्यात
एककीडे एलन मस्क आपल्या ‘ग्रोक’ (Grok) या एआय चॅटबॉटची पाठराखण करत असले तरी, त्यांची कंपनी ‘xAI’ देखील वादांपासून वाचलेली नाही. गेल्या महिन्यात मस्क यांच्या ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर ‘ग्रोक’द्वारे तयार केलेले अश्लील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यामध्ये काही अल्पवयीन मुलांशी संबंधित फोटोंचाही समावेश असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर कॅलिफोर्नियाचे ॲटर्नी जनरल आणि युरोपियन युनियनमधील नियामक संस्थांनी चौकशी सुरू केली असून काही देशांनी यावर बंदीही घातली आहे.
मूळ उद्देशापासून भरकटल्याची टीका
एलन मस्क यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली की, ‘ओपनएआय’ची स्थापना गुगलला पर्याय म्हणून आणि एआय सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी करण्यात आली होती. त्यांच्या मते, गुगल एआयच्या धोक्यांकडे गांभीर्याने पाहत नव्हते. मात्र, आता नफ्यासाठी ओपनएआयने आपला मूळ मार्ग सोडल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे.
मस्क यांनी आपली एक चूकही केली मान्य
याच दरम्यान, मस्क यांनी आपली एक चूकही मान्य केली आहे. त्यांनी ओपनएआयला १०० दशलक्ष डॉलर्सची देणगी दिल्याचे यापूर्वी सांगितले होते, मात्र कागदपत्रांनुसार हा आकडा ४४.८ दशलक्ष डॉलर्सच्या आसपास असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्स (AGI) जर योग्यरित्या हाताळले गेले नाही, तर त्यामध्ये मोठा धोका असल्याचेही त्यांनी यावेळी कबूल केले.
AI च्या क्षेत्रात वावरताना प्रत्येक गोष्ट पारखून घेणे आवश्यक असल्याचे मत अभ्यासक व्यक्त करतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार AI वापरताना आपली माहिती, फोटो, व्हिडीओच्या रुपाने कंपन्यांकडे जात असते. कंपनीने जरी सुरक्षेची हमी दिली असली तरी सायबर क्षेत्रातील हॅकींग चोरीचे प्रमाण पाहता आपण स्वत: देखील त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच व्हिडीओ, फोटो AI कडून घेणाऱ्या व्यक्तींनी देखील बेकायदेशीर गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक आहे.
Comments are closed.