केवळ एक विकेट, जसप्रीत बुमराह इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; कपिल देवच्या खास यादीत होईल एंट्री

इंग्लंडविरुद्ध भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा शेवटाला आली आहे.या स्पर्धेत आता केवळ उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना बाकी आहे. यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. हा सामना ५ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार असून बुमराहला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्सचा आकडा पार करण्याची संधी आहे.
आतापर्यंत केवळ ७ भारतीय गोलंदाजांनी ५०० विकेट्सचा आकडा पार केला आहे. त्यामध्ये अनिल कुंबळे (९५६), रविचंद्रन अश्विन (७६५), हरभजन सिंग (७१७), कपिल देव (६८७), रविंद्र जडेजा (६३४), जहीर खान (६१०) आणि जवागल श्रीनाथ (५५१) यांचा समावेश आहे.
बुमराहने तिन्ही प्रकारामध्ये मिळून ४९९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने कसोटीमध्ये ५२ डावांत २३४ विकेट्स, वनडेच्या ८८ डावांमध्ये १४९ विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२०च्या ९० डावांमध्ये ११६ विकेट्स घेतल्या आहेत. आता त्याने इंग्लंडविरुद्ध एक विकेट घेताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स टप्पा गाठणारा आठवा भारतीय ठरेल.
भारताला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. या स्पर्धेत भारताने केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सुपर-८ सामना गमावला आहे. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवत गतविजेत्या भारताने उपांत्य फेरी गाठली. आता इंग्लंडविरुद्ध भारताला बुमराहकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याचे हे आयपीएलमधील घरचे मैदान असल्याने तो या उपांत्य फेरीच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
बुमराहने भारताला अनेक सामन्यांमध्ये उत्तम सुरूवात करून दिली आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध रोस्टन चेज आणि शिमरन हेटमारयच्या विकेट्स घेतल्या होत्या. सध्याचा इंग्लंडचा संघ पाहिता फलंदाजीत ते लयीत असून त्याचा कर्णधार हॅरी ब्रूकने या स्पर्धेत एक शतकही ठोकले आहे. यामुळे त्याच्यासह जोस बटलर, फिल सॉल्ट आधी इंग्लंड फलंदाजांचे आव्हान असणार आहे.
Comments are closed.