बाबर आझमवर पाकिस्तान क्रिकेटची कडक कारवाई! टी20 वर्ल्ड कपमधील वाईट कामगिरीमुळे मिळाली ‘ही’ शिक्षा

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पाकिस्तान सुपर-८मध्ये केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे स्पर्धेबाहेर झाला. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) खडबडून जागे झाले आहेत. त्यांचे निवड अधिकारी अलीम दार यांनी राजीनामा दिला. आता बोर्डने बाबरवरही कडक कारवाई केली आहे. टी२० विश्वचषकात त्याला संघाच्या अंतिम अकरामधून बाहेर केले होते. आता त्याला थेट संघातून बाहेर करण्यात आले आहे.

पीसीबीने बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी १५ खेळाडूंची नावे जाहीर केली. या मालिकेत तीन सामने खेळले जाणार असून त्यातील पहिला सामना ११ मार्चला खेळला जाणार आहे. दुसरा सामना १३ मार्च आणि तिसरा सामना १५ मार्चला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने ढाकाच्या शेर ए बांग्ला नॅशनल स्टेडियवर खेळले जाणार आहे. या सामन्यांसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर झाल्याने त्यामध्ये बाबरचा समावेश नाही.

बाबरने २०२५ मध्ये १७ वनडे सामने खेळले असून त्यामध्ये ५४४ धावा केल्या आहेत. तसेच त्याने पाकिस्तानच्या शेवटच्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता बोर्डने त्याला संघातून वगळले आहे. यामुळे बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तान संघात अनेक नवे चेहरे दिसणार आहे.

बाबरने टी२० विश्वचषकात ६ सामने खेळले. यामध्ये त्याने केवळ ९१ धावा केल्या. तसेच त्याला श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात अंतिम अकरामध्येही घेतले नव्हते. आता तर त्याला थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याच्याबरोबरच फखर जमान, सईम आयुब, नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांनाही वनडे मालिकेसाठी निवडले नाही.

टी२० विश्वचषकाला मुकलेल्या हॅरीस रौफचे संघात पुनरागमन झाले आहे. अबरार अहमद, फहीम अशरफ, फैजल अकरम आणि मोहम्मद रिझवान यांनाही बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात घेतले आहे. या मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व शाहीन शाह आफ्रिदी करणार आहे.

बांग्लादेश वनडेसाठी पाकिस्तानचा १५ सदस्यीय संघ
शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फैसल अक्रम, हॅरिस रौफ, हुसैन तलत, माझ सदाकत, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, मुहम्मद गाझी घोरी (विकेटकीपर), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा आणि शमिल हुसेन

Comments are closed.