ग्लेन मॅक्सवेलने निवृत्तीवर सोडले मौन; वर्ल्ड कप दरम्यान दिले मोठे विधान!

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी अत्यंत खराब राहिली. संघ लीग स्टेजमधूनच बाहेर पडला. सेमीफायनल तर लांबच, पण ऑस्ट्रेलियाला सुपर ८ मध्येही आपली जागा बनवता आली नाही. ३७ वर्षीय ग्लेन मॅक्सवेलने संघासाठी सुमार कामगिरी केली. त्याला एकही मोठी खेळी साकारता आली नाही. असे असूनही तो सध्या निवृत्ती घेण्याच्या विचारात नाहीये. त्याने यावर एक मोठे विधान केले आहे.
ऑस्ट्रेलियातील पत्रकारांशी संवाद साधताना मॅक्सवेल म्हणाला, “मला असे वाटते की, माझ्या भविष्याबाबत कोणताही निर्णय न घेणे हे कदाचित पुढील १२ महिन्यांत घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून आहे. वर्ल्ड कप दरम्यान मला असे जाणवले की माझी कामगिरी सातत्याने सुधारत गेली. मी माझ्या कामगिरीचे मूल्यमापन विकेट्स किंवा धावांच्या आकड्यांपेक्षा, मैदानावरील माझी धावपळ आणि माझ्या भावनांच्या आधारावर अधिक करतो.”
”आणि मला असे वाटले की मी सामन्यांमध्ये सहजतेने पुढे जात होतो. मला जाणवले की मी माझी भूमिका शक्य तितक्या चांगल्या प्रकारे पार पाडत होतो आणि मला अजूनही क्रिकेटला बरेच काही द्यायचे आहे,” असेही मॅक्सवेलने पुढे नमूद केले.
ग्लेन मॅक्सवेल सध्या निवृत्ती घेण्याच्या मनस्थितीत नाही. टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये त्याने अनुक्रमे ९, ३१ आणि २२ धावा केल्या. यापूर्वी रिकी पाँटिंगने ग्लेन मॅक्सवेलच्या निवृत्तीबद्दल भाकीत केले होते आणि म्हटले होते की, आगामी २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये मॅक्सी ऑस्ट्रेलियन संघात नसेल.
’आयसीसी रिव्ह्यू’वर बोलताना पाँटिंग म्हणाला होता की, मॅक्सवेल लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नसेल आणि त्याचे करिअर आता संपल्यासारखे दिसत आहे. परंतु, आता असे दिसते आहे की मॅक्सवेल पाँटिंगचे म्हणणे चुकीचे सिद्ध करेल. तो आपल्या टी-२० करिअरकडे दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहत आहे.
Comments are closed.