IPL 2026: चिन्नास्वामीवर विराट कोहलीचं आगमन नक्की! आरसीबी चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर

आयपीएल 2026 (Indian premiere league 2026) पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (RCB) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गतविजेता संघ आरसीबी आपले बहुतेक घरचे सामने पुन्हा एकदा बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना दिसेल. फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे की, संघ पाच होम मॅचेस बेंगळुरूमध्ये खेळेल, तर दोन सामने रायपूरमध्ये आयोजित केले जातील.

गेल्या हंगामात जेतेपद मिळवल्यानंतर स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे या मैदानावर सामने होण्याबाबत अनिश्चितता होती. त्या दुर्दैवी घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या मैदानावर कोणतीही मोठी घरगुती स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि महाराजा ट्रॉफीसारख्या स्पर्धाही येथे खेळवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आरसीबी आयपीएल 2026 मध्ये आपल्या होम ग्राउंडवर खेळू शकेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आता फ्रँचायझीने जाहीर केले आहे की, प्रदीर्घ प्रक्रिया आणि सर्व आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर संघाला बेंगळुरूमध्ये खेळण्याची मंजुरी मिळाली आहे. आरसीबीने निवेदनात म्हटले आहे की, सरकार, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सुरक्षा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे आरसीबी आपले पाच सामने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळेल. उर्वरित दोन “होम मॅचेस” रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील. फ्रँचायझीच्या मते, रायपूरमधील सामने आधीच ठरलेल्या नियमांनुसार खेळवले जातील.

आरसीबीचे सीईओ राजेश मेनन (Rajesh Manon CEO of RCB) म्हणाले की, चिन्नास्वामी हे केवळ एक मैदान नसून ते संघाच्या ओळखीचा भाग आहे. येथील प्रेक्षकांचा उत्साह खेळाडूंसाठी नेहमीच प्रेरणेचे काम करतो. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, चाहत्यांनी प्रत्येक परिस्थितीत संघाला साथ दिली आहे आणि ते आपल्या घरच्या मैदानात संघाला खेळताना पाहण्याचे मानकरी आहेत. याचसोबत मेनन यांनी कर्नाटक सरकार, केएससीए आणि कर्नाटक पोलिसांचे आभार मानले.

आयपीएल 2026 मध्ये चिन्नास्वामीवर सामने होण्यामागे आणखी एक खास कारण आहे. ते म्हणजे विराट कोहलीची ‘घरवापसी’. कोहलीचे या मैदानाशी खास नाते आहे आणि बेंगळुरूचे चाहते त्याला नेहमीच भरभरून पाठिंबा देतात. अशा परिस्थितीत स्टेडियममध्ये पुन्हा एकदा कोहली-कोहली” असा गजर ऐकू येईल, अशी पूर्ण खात्री आहे.

Comments are closed.