T20 WC 2026 – वाटचाल नाही, अंतिम निकाल महत्वाचा; मॉर्न मॉर्कलने फुंकले विजयाचे रणशिंग

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मधील दुसरा उपांत्य सामना हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगणार आहे. या निर्णायक सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्कल यांनी संघाच्या कामगिरीवर भाष्य करताना विजयाचे रणशिंग फुंकले. तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात, आतापर्यंत वाटचाल कशी केली याला महत्त्व नाही, तर पुढचे दोन सामने तुम्ही कसे खेळता आणि जिंकता, हेच सर्वात महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत मॉर्कल यांनी खेळाडूंना कानमंत्र दिला.

यजमान हिंदुस्थान आणि दोन वेळच्या विजेत्या इंग्लंड या दोन्ही संघांचा या स्पर्धेतील प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. हिंदुस्थानला वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो अशा सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी गाठावी लागली. हिंदुस्थानचा मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्ती चांगलाच महागडा ठरत असून त्याच्या कामगिरीवर सवाल उपस्थित केले जात होते. त्याबाबत विचारले असता मॉर्कल म्हणाला, आम्ही सामने जिंकले आहेत. हिंदुस्थानमध्ये गोलंदाजी करताना चुकांना फार कमी वाव असतो. प्रत्येक वेळी प्रतिस्पर्ध्याला 120-130 धावांत रोखणे शक्य नसते.

दरम्यान, हा हाय व्होल्टेज सामना मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाबद्दल बोलताना मॉर्कल यांनी खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज वर्तवला. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात दव पडण्याची शक्यता असल्याने नाणेफेक निर्णायक ठरेल. वानखेडेचे मैदान लहान असल्याने येथे चेंडू वेगाने सीमारेषेबाहेर जातो. त्यामुळे गोलंदाजांना प्रत्येक चेंडूवर सावध राहावे लागेल. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ अत्यंत धोकादायक आणि ‘स्ट्रीट स्मार्ट’ आहे. त्यांच्याकडे तळापर्यंत फलंदाजीची खोली आहे.

उद्याचा सामना दोन आक्रमक संघांमधील मोठी लढत असेल. आम्हाला ‘परफेक्ट गेम’ खेळण्याची गरज आहे आणि आमचा एखादा खेळाडू नक्कीच मोठी कामगिरी करून संघाला फायनलमध्ये पोहोचवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments are closed.