SA vs NZ: एडन मार्करमचा ऐतिहासिक पराक्रम! ग्रीम स्मिथचा 16 वर्षांपूर्वीचा विक्रम उध्वस्त

कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर टी-20 वर्ल्ड कप 2026 चा पहिला सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (South Africa vs Newzealand) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने (Mitchell Sentner) टॉस जिंकला असला, तरी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने (Aiden Markram) मैदानात पाऊल टाकताच नवा इतिहास रचला आहे. मार्करमने ग्रीम स्मिथचा 16 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे.

न्यूझीलंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जेव्हा एडन मार्करम सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकसोबत मैदानात उतरला, तेव्हा तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणारा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ठरला. कर्णधार म्हणून टी-20 वर्ल्ड कपमधील मार्करमचा हा 17 वा सामना आहे.

यापूर्वी माजी दिग्गज कर्णधार ग्रीम स्मिथच्या नावावर हा विक्रम होता. स्मिथने 2007 ते 2010 दरम्यान 16 सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले होते. मार्करमने आता हा 16 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यात हा टप्पा गाठणे मार्करमसाठी खूप अभिमानास्पद आहे. गेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मार्करमच्या नेतृत्वाखाली संघाने फायनलपर्यंत मजल मारली होती, पण भारताकडून पराभूत झाल्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता पुन्हा एकदा आपल्या संघाला विजेतेपदाच्या सामन्यापर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी मार्करमच्या रूपात समोर आहे.

Comments are closed.