जेएनपीए बंदरात विविध मालाचे 5000 कंटेनर अडकून पडले, शिपिंग कंपन्या संकटात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युद्धामुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे मध्य पूर्वेकडील जहाज वाहतूक सागरी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक मालवाहू जहाजे आखातात अडकली आहेत. त्याचा मोठा परिणाम शिपिंग कंपन्यांवर झाला असल्याची माहिती कंटेनर शिपिंग लाइन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील वासवानी यांनी दिली. दरम्यान जेएनपीए बंदरातुन आखातात निर्यात करण्यात येणाऱ्या विविध मालाचे ५००० कंटेनर अडकून पडले असल्याचे बुधवारी जेएनपीएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जेएनपीएने युद्धाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाची माहिती देण्यासाठी बुधवारी निवेदन जारी केले आहे. जेएनपीएने सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, जेएनपीए बंदरात रीफर कंटेनरसह ५००० हून अधिक कंटेनर अडकले आहेत. सर्व रिफर कंटेनर प्लग इन आहेत. ग्राहकांना आधार देण्यासाठी आणि अनावश्यक मालवाहतूक किंवा अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी, जेएनपीए बंदर परिसरात स्टॉकिंग सुविधा आणि विस्तारित स्टोरेज प्रदान करत आहे. बंदर प्रशासन सर्व संबंधित शुल्कांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करीत आहे. बहुतेक टर्मिनल्सवर माल हाताळणी शुल्क अधिसूचित दरांनुसार मर्यादित आहे.चालू आव्हानांमध्ये जेएनपीए भागधारकांच्या समर्थनासाठी आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेसाठी वचनबद्ध असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

दरम्यान इराणने होर्मुझ समुद्रधुनी बंद केल्यामुळेच मध्य पूर्वेकडील जहाज वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.विविध शिपिंग कंपन्यांची अनेक मालवाहू जहाजे आखातात अडकली आहेत.जगाच्या इतर भागांना जाणारी उर्वरित जहाज वाहतूक सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहेत.त्याचा मोठा परिणाम शिपिंग कंपन्यांवर झाला असल्याची माहिती कंटेनर शिपिंग लाइन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील वासवानी यांनी दिली.

Comments are closed.