‘इथेच टाका तंबू’ रंगभूमीवर सामाजिक भानाचा ठसा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या ललित कला केंद्राची पहिली निर्मिती असलेले ‘इथेच टाका तंबू’ हे दोन अंकी प्रायोगिक नाटक राष्ट्रीय स्तरावर झेपावले आहे. हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक, कलगीतुरा, दगड आणि माती, गढीवरच्या पोरी यांसारखी अनेक प्रायोगिक नाटके गाजवल्यानंतर, प्रा. दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित हे नवे नाटक एका विलक्षण घटनेवर आधारित सामाजिक आशय उलगडते. त्याचे कथासूत्र सांगू नये, तर ते प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवावे असे आहे. पत्रकारितेच्या भानातून जन्मलेली ही कथा केवळ एका प्रसंगाची नाही; ती त्या प्रसंगामागील सामाजिक पदर उघडते. सोपी, पण टोकदार भाषा आणि वास्तवाला भिडणारे संवाद हे लेखनाचे वैशिष्टय़.

ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार, अमेय बर्वे आणि उमेश जगताप यांच्या कसदार अभिनयामुळे नाटय़ानुभव अधिक प्रभावी ठरतो. विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेले नेपथ्य, प्रकाशयोजना आणि तांत्रिक बाजू या प्रयोगाला समर्थ साथ देतात. प्रायोगिक रंगभूमीवर नवा ठसा उमटवणारा हा तंबू खरोखरच ‘इथेच’ रोवला जावा आणि अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचावा अशीच अपेक्षा!

Comments are closed.