T20 WC 2026 Ind vs Eng: लढाई इंग्लंडशी, लक्ष फायनलवर
T20 WC 2026 भारत विरुद्ध इंजी: टी-ट्वेन्टी स्पर्धेच्या भैरवीचा क्षण जवळ येतोय. भारताची सेमी फायनल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलीय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या लढाईला गुरुवारी तोंड फुटणार आहे. नॉक आऊटसारख्या झालेल्या विंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये सूर्या ब्रिगेडने बाजी मारत सेमी फायनलचं तिकीट मिळवलं. आता गाठ आहे हॅरी ब्रुकच्या इंग्लीश आर्मीशी.
इंग्लंडनेही स्पर्धेत जोशात खेळ केलाय. खरं तर विंडिजविरुद्ध याच वानखेडेवर इंग्लंडला पराभवाचा धक्का बसलेला. या मॅचनंतर इंग्लंडने सातत्यपूर्ण खेळ करत आगेकूच केली. सॉल्ट, बटलर, ब्रुक, बेथेल, बँटन, करन, जॅक्स अशी मजबूत फलंदाजीची फळी त्यांच्याकडे आहे. तरीही भारताच्या फिरकी माऱ्यासमोर त्यांचा कस लागणार आहे. खास करून वरुण आणि अक्षर जोडी त्यांची परीक्षा घेईल हे नक्की. वानखेडेच्या खेळपट्टीवर बाऊन्स चांगला मिळतो. याचा फायदा दोन्ही टीमच्या फलंदाजांना फटके खेळताना होईल.
भारताची टीम लयीत आली असली तरी सांघिक पातळीवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने आता खेळाचा दर्जा उंचवावा लागणार आहे. दमदार सलामी, भक्कम मधली फळी आणि हाणामारीच्या षटकात जोरदार आक्रमण या त्रिसूत्रीवर आपला खेळ आता व्हायला हवा. अविस्मरणीय खेळीतून बाहेर येत संजू सॅमसन आणखी एक मोठी इनिंग करण्यास उत्सुक असेल. त्याच वेळी अभिषेक, ईशान आणि कंपनी फटक्यांची आतषबाजी करायला उत्सुक असेल. होळी नुकतीच झालीय. पण, या फलंदाजांना त्यांच्या क्षमतेला साजेशी फटक्यांची मनमुराद उधळण करता आली नाहीये. सेमी फायनलमध्ये हे उट्टं फेडण्यासाठी ही जोडगोळी उत्सुक असेल. तसंच सूर्यकुमार यादवही एका मॅच विनिंग इनिंगच्या प्रतीक्षेत आहे.
गोलंदाजीत बुमरा आणि वरुण हे आपले हुकमी एक्के आहेत. बुमराकडे असलेलं वैविध्य, त्याचा स्लोअर वन, यॉर्कर फलंदाज कितीही सेट असला तरी त्याला स्वस्थ बसू देत नाही. तर, वरुणच्या गुगलीचं अप्रतिम मिश्रण फलंदाजांचं जगणं मुश्किल करत असतो. अन्य गोलंदाजांची समर्थ साथ लाभल्यास आपण इंग्लंड टीमच्या फलंदाजीला वेसण घालू शकतो. आपली टीम अधिक परिपूर्ण भासत असली तरी नॉक आऊट मॅच आणि सेमी फायनलचा दबाव लक्षात घेता सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा आहे. सलग तिसऱ्यांदा हेच दोन संघ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत एकमेकांशी दोन हात करतायत. तेव्हा विजयाचा झेंडा आपलाच फडकावा अशी आशा भारतीय क्रिकेटरसिक करतायत.
संबंधित ब्लॉग:
Ind vs WI T20 WC 2026: सूर्या ब्रिगेड 'मिशन सेमी फायनल'
Comments are closed.