खासदार रुहुल्ला मेहदी यांच्याविरोधात एफआयआर

माजी महापौर मट्टूंवरही गुन्हा : काश्मीरमध्ये अफवा फैलावण्याचा आरोप

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोशल मीडिया पोस्टद्वारे जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये अफवा फैलावण्याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा रुहुल्लाह मेहदी आणि श्रीनगरचे माजी महापौर जुनैद अजीम मट्टू यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे.

चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती शेअर करणारी पोस्ट डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात आली होती. काही पोस्ट्स लोकांमध्ये भीती आणि अस्थिरता निर्माण करू शकतील असे ठोस इनपूट्स मिळाले होते असे पोलिसांनी सांगितले आहे. भीती निर्माण करणे, सार्वजनिक व्यवस्थेला प्रभावित करणे आणि अवैध कारवायांना बळ पुरविण्याच्या उद्देशाने खोटे आणि कल्पित कंटेंट फैलावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चौकशीच्या आधारावर पुढील कारवाई केली जाणार आहे. खोटी माहिती फैलावण्याचे अशाप्रकारचे प्रयत्न शांतता, सुरक्षा आणि सामाजिक स्थिरतेसाठी गंभीर धोका ठरू शकतात असे पोलिसांचे सांगणे आहे.

सुरक्षा कमी केल्याचा पोस्टमध्ये दावा

खासदार आगा सैयद रुहुल्लाह मेहदी आणि माजी महापौर मट्टू यांनी सोशल मीडियावर पेस्ट करत स्वत:ची सुरक्षा कमी किंवा मागे घेण्यात आल्याचा दावा केला होता. पोलिसांनी याला खोटी माहिती ठरवत गुन्हा नोंदविला आहे. खासदार मेहदी यांनी यावर अशा गुन्ह्यांमुळे मला कुठलाच फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. देशाचा नागरिक म्हणून मी स्वत:च्या अधिकारांचा वापर करत राहणार आणि अन्याय, कायद्याच्या उल्लंघनाच्या विरोधात आवाज उठविता येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

गप्प बसविण्याचा प्रयत्न : मट्टू

इराणशी निगडित मुद्दे आणि आंतरराष्ट्रीय घटनांवर मी केलेल्या वक्तव्यांमुळे माझी सुरक्षा मागे घेण्यात आली आहे. हे पाऊल मला गप्प बसविण्याच्या उद्देशाने उचलण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय घटनांवर सरकार मौन बाळगून असल्याचा आरोप श्रीनगरचे माजी महापौर मट्टू यांनी केला आहे.

Comments are closed.