Beed News – अखेर जिल्हा परिषद च्या शिक्षण विभागाने शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचे दिले आदेश; दैनिक सामनाच्या बातमी नंतर प्रशासनाला आली जाग
कुणाल पवारे
कुंडलवाडी जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे विद्यार्थी,पालक व शिक्षक वर्गातून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी होत होती.याबाबत दैनिक सामना च्या ३ मार्च रोजीच्या अंकात ही बातमी प्रकाशित केली होती.अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास जाग आली असून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश ५ मार्च रोजी काढले आहेत. त्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरणार असल्याने विद्यार्थी,पालक व शिक्षक यांना,दिलासा मिळाला आहे.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांकडून दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की,शिक्षण विभाग शाळा सकाळ सत्रात भरविण्याचा निर्णय घेतात.पण यावर्षी मार्च महिना सुरू होऊनही तसेच वाढती उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरविण्याचा निर्णय जि.प.शिक्षण विभागाने घेतला नव्हता.उन्हाचा तडाखा विचारात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे,अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने मुलांना पिण्याचे पुरेसे पाणी उपलब्ध नाही. काही शाळांत पंखे नसल्याने विद्यार्थी उकाड्याने हैराण होत आहेत. पारा चाळिशीच्या जवळ गेला आहे. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थी हे समीकरण उन्हामुळे गुंतागुंतीचे बनले. जिल्हा परिषदेच्या व इतर माध्यमिक शाळांमध्ये इतर ठिकाणाहून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येतात. काही विद्यार्थी एक ते दोन किलोमीटर पायी किंवा सायकलवर देखील उन्हामध्ये प्रवास करत शाळेत येत असतात. उन्हाचा पारा वाढत असून सकाळी ९ वाजेपासून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात होत आहे. सर्व बाबीचा विचार करून शिक्षण विभागाने शाळा तात्काळ सकाळ सत्रात भरविण्याचे आदेश काढावेत अशी मागणी विद्यार्थी,पालक,शिक्षक वर्गातून होत होती.
याबाबत दैनिक सामनाच्या ३ मार्च रोजी च्या अंकात सविस्तर बातमी प्रकाशित करण्यात आली होती. बातमी प्रकाशित होताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला जाग आली असून ५ मार्च रोजी शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता जिल्हाभरातील सर्व माध्यमाच्या शाळा सकाळी ८:३० ते १ वाजेच्या दरम्यान भरण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून विद्यार्थी,पालक व शिक्षक यांना दिलासा मिळणार आहे. उन्हाच्या तीव्रतेने शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची बातमी प्रकाशित करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला जागे केल्याने विद्यार्थी,पालक व शिक्षकांकडून दैनिक सामनाचे आभार व्यक्त होत आहे.
Comments are closed.