T20 WC 26: पाकिस्तानी क्रिकेटरने केले महिला हॉटेल स्टाफशी गैरवर्तन! झाली दंडात्मक कारवाई

दिवसेंदिवस पाकिस्तान क्रिकेटच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एक माहिती समोर आली होती की टी२० विश्वचषकामध्ये वाईट कामगिरी केल्याने प्रत्येक खेळाडूकडून ५० लाखांचा (पाकिस्तानी रुपये) दंड वसूल केला जाणार. पाकिस्तान सुपर-८मध्ये पोहोचला आणि उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. मागील तीन आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांची अशीच कामगिरी सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये अनेक बदल दिसणार आहेत.
आता आणखी एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका सूत्रानुसार, पाकिस्तानच्या एका खेळाडूने हॉटेल स्टाफशी गैरवर्तन केल्याचे कळते. ही घटना कॅंडीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-८ सामन्याआधी घडली, अशी माहिती टेलीकॉम एशिया स्पोर्ट्सने दिली. त्यांनी म्हटले, “पाकिस्तानच्या विश्वचषक संघातील एका अनामिक सदस्याची तक्रार करण्यात आली आणि कॅंडीमध्ये एका महिला हॉटेल स्टाफ सदस्याशी गैरवर्तन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला.”
त्यावेळी त्या पाकिस्तानी खेळाडूने हाऊसकिपींग स्टाफशी गैरवर्तन केले असता तिने आवाज केला आणि त्यानंतर तेथिल कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची माहिती पाकिस्तानचे मॅनेजर नवीद चीमा यांना दिली गेली. त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी कडक कारवाईची मागणी केली होती, मात्र चीमा यांनी हॉटेल व्यवस्थापकांची माफी मागितली आणि दंड ठोठावत ते प्रकरण निस्तरले.
तो पाकिस्तानी क्रिकेटपटू कोण हे समोर आले नाही, मात्र घरी परतल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्याचा अधिक तपास करणार आहे.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या वातावरण तापले आहे. नुकतेच बोर्डने बांग्लादेशविरुद्धच्या तीन सामन्यांचा वनडे मालिकेसाठी १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. त्यामधून बाबर आझम, सईम आयुब आणि नसीम शाह यांना संघाबाहेर केले असून मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच या मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व शाहीन शाह आफ्रिदी करणार आहे.
हे तिन्ही सामने ढाकामध्ये खेळले जाण्याचे नियोजन आहे, मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे ती मालिका रद्द होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.